पुणे: पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये रेकी करून व वेशांतर करत भरदुपारी घरफोड्या करणार्या सराईत घरफोड्याला 50 पेक्षा अधिक घरफोड्या केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 17 लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची उपस्थित होती. हर्षद पवार (वय 31) असे या अट्टल चोराचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी एका घरफोडी प्रकरणात गुन्हा दाखल होता. 4 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा म्हसोबा गेट बसस्टॉप, शिवाजीनगर येथे थांबल्याची माहिती मिळाली.
याप्रकरणी हर्षदला अटक केल्यानंतर, चौकशीत त्याच्याकडून शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत 3, वारजे माळवाडी हद्दीत 3, खडक हद्दीत 2, विमानतळ हद्दीत 2 तर चंदननगर, बावधन आणि आळंदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी 1 अशा 13 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, राजकुमार केंद्रे, अजित बडे, रूपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, राजकिरण पवार, महावीर कलटे, सचिन जाधव, आदेश चलवादी यांच्या पथकाने केली.