प्रसाद जगताप
पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यानच्या पुणे मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर 2025 अखेर येथून मेट्रो धावणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वैतागलेल्या कंपन्यांमधील कर्मचारी आणि आयटीयन्सला लवकरच दिलासा मिळणार आहे.
हिंजवडी भागात पुण्यातील मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र आहे. या भागात असंख्य कर्मचारी, अधिकारीवर्ग कामानिमित्त दररोज खासगी आणि कंपनीच्या वाहनाने ये-जा करतात. मात्र, त्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
कोंडीने कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी अक्षरश: वैतागलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मेट्रोचे काम सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम सुरू आहे. ते कधीपर्यंत पूर्ण होईल आणि आमची रोजच्या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होईल? असा प्रश्न या भागातील स्थानिक रहिवासी, आयटीयन्स आणि चाकरमान्यांना पडला आहे.
या मेट्रोमार्गाचे किती काम पूर्ण झाले आहे, किती स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत, कोणती कामे बाकी आहेत, मेट्रो कधीपासून धावणार, याची माहिती घेतली. त्या वेळी त्यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करणार असून, त्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
या मार्गाची पहिली मेट्रो शहरात दाखल पुणे मेट्रोची या मार्गासाठीची पहिली ट्रेन शहरात दाखल झाली आहे. अलस्टॉम या कंपनीने आपल्या श्रीसिटी (आंध्र प्रदेश) येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो पूर्णपणे स्वदेशी बनवटीची आहे. कित्येक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही पहिली मेट्रो माण येथील डेपोमध्ये दाखल झाली आहे.
मेट्रोच्या डोक्यावर इलेक्ट्रिक तारा दिसणार नाहीत
पुणे मेट्रोकडून आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी अत्याधुनिक थर्ड रेल सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. या थर्ड रेल प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या 23.3 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोला रुळांच्या शेजारून, खालून विद्युतपुरवठा केला जाईल. या संपूर्ण मार्गावर कुठेही ट्रेनच्या बाजूने किंवा डोक्यावर इलेक्ट्रिकच्या खांबांचे किंवा तारांचे जंजाळ दिसून येणार नाही.
वेगाने काम होण्यासाठी विशेष कंपनीची स्थापना
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण.
डिसेंबर 2025 अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन.
मेट्रोमार्गिकेची लांबी 23.2 किलोमीटर.
एकूण 923 खाब नियोजित.
एप्रिल 2022 मध्ये गणेशखिंड रस्त्यावर पहिल्या खांबाचे कास्टिंग.
मार्गिकेत 23 स्थानके.
काही स्थानकांची इलेक्ट्रिक कामे सुरू.
पुणे मेट्रोलाइन 3 साठी देखभाल, दुरुस्ती, पार्किंगसाठी माण येथे डेपो उभारण्याचे काम वेगाने सुरू. एकूण 13.2 हेक्टर जागेत हा सुसज्ज डेपो होणार.पुणे आयटी सिटी मेट्रोमार्फत कामे सुरू.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोलाइन 3 चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे.
त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत हे काम सुरू आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यानुषंगाने या मार्गिकेची कामे सुरू आहेत. काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांसाठी ही मार्गिका खुली होईल.- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए