पुणे; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 13) पुणे बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यात लष्कर भागातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बंद ठेवून बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील पाठिंब्याचे पत्र व्यापारी संघटनेच्या वतीने शिवसन्मान जागर पुणेकर कृती समितीला देण्यात आले आहे. या बंदमध्ये पुणे लष्कर भागातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील व्यापारी सहभागी होणार असून, पाठिंबा दर्शविणारे पत्र शिवसन्मान जागर पुणेकर कृती समितीला मार्केटचे अध्यक्ष मंजूर शेख आणि कार्याध्यक्ष शंकर सुर्वे यांनी दिले आहे.
मुस्लिम संघटनांचाही सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 13) पुणे बंद पाळला जाणार आहे. या बंदमध्ये मुस्लिम बांधव सामील होणार असून, 40 मुस्लिम संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. रविवारी कॅम्प भागातील लेडी हवाबाई शाळा बाबाजान दर्गा येथे समन्वय समितीसोबत बैठक आयोजित केली होती. त्यात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे, या सर्व शिवप्रेमी संघटनांसोबत 200 मुस्लिम कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, धार्मिक क्षेत्रातील मौलाना उपस्थित होते.
आंदोलनात जमाते इस्लामी हिंद, जमियत उलेमा हिंद, जमीयतूल कुरेश, एमआयएम, उम्मत सामाजिक संस्था, शाहीन फ्रेंड सर्कल, नदाफ पिंजारी मन्सुरी जमात, पुणे एनजीओ फेडरेशन, बज्मे इस्लाहा, इंडियन मुस्लिम फ्रंट, बज्मे रेहेबर, फैजाने रजा, कोंढवा सोशल फाउंडेशन, होकर संघटना, शेरे हिंद फाउंडेशन, अल कुरेशी यंग सर्कल आदी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.