नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. शाळकरी मुलांचे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये कवायत, लेझीम त्याचबरोबर शिवाजी महाराजांची आग्य्रातून सुटका, असे विविध कार्यक्रम शाळेच्या मुलांनी सादर केले. मुलांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक देखील केले. या वेळी साहसी खेळ विद्यार्थ्यांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे पूर्ण तयारी करून आलेल्या मुलांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. एकूणच शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी बघावयास मिळाली.
शिवजयंती सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हेलिकॉप्टर साडेआठ वाजता शिवनेरी किल्ल्यावर आले. सकाळी आकाशामध्ये ढग असल्यामुळे कार्यक्रमांमध्ये काही व्यत्यय येतोय का? अशी शंका सुरुवातीला व्यक्त होत होती; मात्र या शंका फोल ठरल्या. त्यानंतर 9 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार एकत्र हेलिकॉप्टरद्वारे किल्ले शिवनेरीवर पोहोचले. शिवजन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर या सगळ्या मान्यवरांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला. जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक यांनी देखील शिव जन्मस्थळाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
किल्ले शिवनेरीवरील कुलूप दरवाज्याजवळ अरुंद जागा आहे. बुधवारी (दि. 18) मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ज्योत पेटवून उतरत असलेल्या शिवभक्ताला धक्का लागल्याने शिवभक्ताच्या अंगावर तेल पडून तो भाजला. त्याच्यासह दोन शिवभक्तांच्या हात तसेच पायाला मोठा मार लागला आणि 8 शिवभक्त या घटनेत जखमी झाले होते. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली.
बुधवारी मध्यरात्रीपासून शिवभक्तांची मोठी गर्दी शिवनेरी किल्ल्यावर पाहायला मिळाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून ते जन्मस्थळापर्यंत ठेवण्यात आला होता, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.