पुणे; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रात वारंवार अपमान केला जात आहे. त्यामध्ये राज्यपालांसह भाजपचे प्रवक्ते आणि नेते यांचा समावेश असून, त्यांची त्वरित हकालपट्टी करावी, या मागणीसाठी मराठा संघटना व अन्य सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी मंगळवारी (दि. 13) 'पुणे बंद'ची हाक दिली आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ यांसह सर्व मराठा संघटना, सर्वपक्षीय पदाधिकार्यांची बुधवारी बैठक झाली. यात मंगळवारी 'पुणे बंद' पाळण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिवरायांच्या सन्मानासाठी या बंदमध्ये पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवराय तसेच बहुजन महापुरुषांचा वारंवार अवमान करतात. प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, भाजपचे प्रवक्ते व रावसाहेब दानवे या भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून असेच प्रकार घडत आहेत. सगळ्या वाचाळवीरांची हकालपट्टी करावी. यांच्यावर कठोर शासन करावे आणि यापुढे जर कोणी शिवरायांची बदनामी केली, तर अशांना याच पुण्यातील शिवप्रेमी जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली.
या वेळी या बैठकीस संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनता दल, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, मुस्लिम बांधव, मातंग समाजातील बांधव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे सर्व जाती-धर्मांतील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
या वेळी बैठकीस अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, संतोष शिंदे, संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, अविनाश मोहिते, रवींद्र माळवदकर, दत्ता सागरे, प्रशांत धुमाळ, भीमराव कांबळे, अंजुम इनामदार, फिरोज मुल्ला, दत्ता पोळ, मुकेश यादव, नीता अडसुळे, रोहिदास तोडकर, मंदार बहिरट, चंद्रशेखर घाडगे, संदीप लहाने, महेश टिळे, सनी थोपटे, रोहन पायगुडे आदी शिवप्रेमी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.