पुणे : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेऊन दिला जाणारा महत्त्वाचा शिवछत्रपती पुरस्कार कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला क्रीडामंत्री यांनी स्टेजच्या नियोजनावरून इव्हेंट मॅनेजमेंटलाच फैलावावर घेतले. महत्त्वाचा पुरस्कार असल्याने कोणत्याही चुका मी खपवून घेणार नाही, असा पवित्राही क्रीडामंत्र्यांनी यावेळी घेतला.
शिवछत्रपती पुरस्कार 2022-23 आणि 23-24 या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दि 18 एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य कार्यक्रमाच्या स्टेजची पाहणी करीत असताना इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यक्तीला चांगलेच फैलावर घेतले. नेहमी कामे करूनही आपल्याकडून अशा चुका राहत असतील तर हे योग्य नाही. महत्त्वाचा पुरस्कार असल्याने कोणत्याही चुका मी खपवून घेणार नाही, असा पवित्राही क्रीडामंत्र्यांनी यावेळी घेतला.
दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातील पुरस्कारार्थींचे पुण्यात आगमन झाले आहे. या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे शुक्रवार, 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शानदार समारंभात वितरण होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
भरणे म्हणाले, या जीवनगौरव पुरस्कारात प्रथमच नारीशक्तीचा गौरव होत आहे. ऑलिंपिक, विश्वकरंडक, आशियाई, राष्ट्रकुल पदक विजेते क्रीडापटू थेट पुरस्काराने सन्न्मानित होणार आहेत. योग खेळाला प्रथमच पुरस्कार दिला जातोय. यामुळे हा पुरस्कार ऐतिहासिक आणि दिमाखदार असणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार समारंभ सर्वांसाठी खुला असून एका ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला क्रीडामंत्र्यांनी सर्व कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यादरम्यान स्टेजवर मांडण्यात आलेल्या खुर्च्यांवरील धूळ पुसत त्यांनी उपस्थित अधिकार्यांवर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही धूळ पाहिली तर चिडतील, या सर्व खुर्च्या चांगल्या साफ करा, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.