निवडणूक काय असते, हे बघायचे असेल तर शिरूर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावरील जिल्हा परिषद गटात एक फेरफटका मारला पाहिजे. पुण्य पदरात पाडायची इथे जणू काही स्पर्धा लागली आहे, कोणी रेल्वे बुक करतोय, तर कुणी ट्रॅव्हल्स एजन्सी. मतदारराजाला काही कमी पडू नये, यासाठी जो-जो इच्छुक आहे तो-तो शर्थीने प्रयत्न करीत आहे. बरं, एका वेळेला हजाराच्या वर माणूस तीर्थाटनाला घराबाहेर पडतोय, काही ठिकाणी तर घराला थेट टाळा लावून अख्खे कुटुंबकबिला इच्छुकाच्या पदरात पुण्याचे पारडे पडावे म्हणून तीर्थाटनाला रवाना झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.(Latest Pune News)
इच्छुक मंडळी सर्वधर्मसमभावनेवर नितांत श्रद्धा ठेवून असल्याने त्यांनी सगळ्याच धर्मांच्या पवित्र ठिकाणाला मतदारांना घेऊन जाण्याची तजवीज केल्यामुळे सगळेच खूष आहेत. गरीब नवाज अजमेर शरीफच्या दर्ग्यावर माथा टेकवण्यासाठी शेकडो भाविक रवाना केले जात आहेत, तर हजारोच्या पटीत उज्जैनच्या महाकाल यात्रेवर आहे. समतेचा संदेश देणाऱ्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर शेकडो अनुयायी पोहचले आहेत. पर्यटकांनी बोलायचे आणि इच्छुकांनी त्यांची इच्छा एका क्षणात पूर्ण करायची, अशा पद्धतीचा माहौल या जिल्हा परिषद गटात निर्माण झाल्यामुळे शेजारच्या जिल्हा परिषद गटात मोठी असूया निर्माण झाली आहे.
निवडणुकीला किती खर्च येईल, याचा अंदाज बांधणे अवघड असल्यामुळे शेकोटीच्या कडेला बसून आपलं नशीब फुटकं आहे राव, आपण जर त्या गटात असतो तर आज तीर्थाटनाला असतो, यावर चर्चा झडत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावरच्या जिल्हा परिषद गटांमध्ये सुगीचे दिवस आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर उज्जैनला गेलो की निवडून येतो, हा ट्रेंड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतही लागू पडेल, ही धारणा बळावल्याने उज्जैन असो की अजमेर ट्रॅव्हल्सच्या ट्रॅव्हल्स रवाना होत आहेत. त्या तुलनेत तालुक्यातील दोन-तीन जिल्हा परिषद गटात मात्र कमालीची शांतता आहे.