शिरूर: गर्भवती महिलेला ग््राामीण रुग्णालयाने दाखल करून न घेतल्याने तिची रस्त्यातच प्रसूती होण्याची घटना शिरूर शहरात शनिवारी (दि. 25) घडली. शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, नगरसेविका पूजा पोटावळे, स्थानिक महिला स्मिता पाटील, प्रियंका गोरे, वृषाली बोरकर, सुवर्णा चिपाडे, तनुजा अवचिते घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी रस्त्यातच या महिलेला मदत करून तिची प्रसूती सुरळीत पार पाडली.
शिरूर निर्माण प्लाझा येथे या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. त्या वेळी रस्त्याने जाणारे पत्रकार सुदर्शन दरेकर यांनी ही घटना डॉ. संतोष पोटे यांना कळविली आणि काही काही वेळातच या महिला मदतीला धावल्या आणि डॉ. सुनीता पोटे यांनी गोंडस बाळाला उंचावून दाखवताच काही वेळांपूर्वी काळजाचा ठोका चुकणाऱ्या नागरिक आणि महिलांनी बाळाचा चेहरा पाहताच टाळ्यांचा कडकडाट केला आणि ‘निर्माण प्लाझा’वर झाला निर्माणचा जन्म... असे म्हणून नागरिकांनी जल्लोष केला.
या वेळी उपस्थितांनी डॉ. पोटे व मदतीला धावणाऱ्या नगरसेविका पूजा पोटावळे, महिला, पत्रकार यांचे कौतुक केले आणि आजही माणुसकी शिल्लक आहे, असे सांगितले. महिलेने रस्त्यातच बाळाला जन्म दिला, असे तेथे उपस्थित महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारील पडवळ कुटुंबाकडून साड्या घेतल्या, तर काहींनी स्कार्फ घेऊन सर्व बंदिस्त केले होते.
महिलेने नवजात बालकाला आपल्या मांडीवर घेतलेे, तर तिचा पती डोक्याला हात लावून तिथे बसला होता. काही वेळांतच महिलांनी तोंडाचे स्कार्फ व साड्यांनी वेढा दिला. या रस्त्याने येणाऱ्या रिक्षाचालकांनी, मेडिकल दुकानदारांनी मदत केली. मुलाची नाळ कापून सर्व सोपस्कार व्यवस्थित करून न रडणाऱ्या या मुलाला डॉ. सुनीता पोटे यांनी त्यांच्या तंत्राने रडायला लावले आणि मग बाळाचे एक दर्शन सर्व नागरिकांना दिले.
काही वेळांपूर्वी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण बाळाचा चेहरा पाहताच एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळाला व त्याच्या आईला डॉ. पोटे यांच्या मीरा नर्सिंग होम येथे घेऊन प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळ आणि त्याच्या आईची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉ. सुनीता पोटे यांनी सांगितले.