शिरूर: शिरूर बायपास परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6.94 ग््रॉम वजनाचा सुमारे 1 लाख 38 हजार 800 रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
ही कारवाई शनिवारी (दि. 11) अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान करण्यात आली. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ एमडी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आला.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8(क), 21(ब) तसेच बीएनएस कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर, नीरज पिसाळ यांनी केली.