शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. 2021 मध्ये निवडणुका होणे हे अपेक्षित असताना चार वर्षे गेल्याने इच्छुकांची संख्या तिप्पट झाल्याने आज इच्छुकांमध्ये दिशाहीन परिस्थिती झाली आहे. आजच्या परिस्थितीला इच्छुकांना आपण कोणाकडून उभे राहायचे, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेची प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यानंतर सुनावणी होऊन अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे.
2016 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 21 नगरसेवक होते व नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून आले होते. आता नवीन प्रभागरचनेनुसार 12 प्रभागांतून 24 नगरसेवक निवडून द्यायचे असून, नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून द्यायचे आहेत.
निवडणूक आता अवघ्या दोन महिन्यांवर आली असूनसुद्धा इच्छुकांमध्ये आपल्याला कोणाकडून उभे राहायचे, याबाबत द्विधामनःस्थिती आहे. सध्याच्या प्रारूप प्रभागानुसार अनेक इच्छुकांनी आपले प्रभाग जरी निवडले असले, तरी संभाव्य राजकीय गणितावर त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळेल व कोणाला मिळणार नाही, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम कायम आहे.
नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी मात्र इच्छुकांमध्ये सैरभैर वातावरणातून कुठलाही ठाम निर्णय घेण्यास अजूनही हे इच्छुक तयार नसून भविष्यात राजकीय वातावरण काय होते, यावर सर्व काही अवलंबून आहे.
धारीवालांची भूमिका स्पष्ट होईना
शिरूर नगरपरिषदेवर 2007 पासून प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या शिरूर विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीसाठी प्रकाश धारीवाल यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट न केल्यामुळे सगळीकडे संभ्रमाचे वातावरण आहे. धारीवाल जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत तोपर्यंत शिरूरमध्ये राजकीय गोंधळाचे वातावरण राहणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
आ. कटके यांची भूमिका महत्त्वाची
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर-हवेलीमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आ. ज्ञानेश्वर कटके हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले. शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेमध्ये ज्ञानेश्वर माऊली कटके यांना शिरूर शहरात मताधिक्य मिळालेले आहे. शिरूर शहरातील आगामी निवडणुकीसाठी काय भूमिका घेतात किंवा त्यांच्या पक्षासाठी ते काय निर्णय घेतात, हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.