टाकळी हाजी(शिरूर); पुढारी वृत्तसेवा : शिरूर पोलिस ठाणे हद्दीमध्ये सन 2022 या कालावधीमध्ये टाकळी हाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग, तसेच गोलेगाव, इनामगाव या परिसरासह शिरूर तालुक्यातून विद्युत शेतीपंप (पाणी उपसा मोटारींची) मोठ्या प्रमाणावर चोरीस गेले होते. त्याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात इलेक्ट्रिक मोटार चोरीचे 9 गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांना तडीपार करण्यात आले आहे.
शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस ठाणे तपास पथक व टाकळी हाजी पोलीस चौकीचे अधिकारी, अंमलदार यांच्या तपास पथकाने चोरांचा कसून शोध घेऊन पांडुरंग शिवाजी बोडरे (वय 21) आणि मोन्या ऊर्फ कुलदीप बबन बोडरे (वय 22, दोघे रा. रावडेवाडी, ता. शिरूर) यांना पकडून त्यांचेकडून सुमारे 16 इलेक्ट्रिक पाणी उपसा मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या.
तसेच, त्यांना 9 गुन्ह्यांत अटक करून न्यायालयात हजर केले होते. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी याची गंभीर दखल घेऊन या दोघांना एक वर्षाकरिता पुणे जिल्हा (पिंपरी-चिंचवड शहर व पुणे शहर हद्दीसह), तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून गुरुवार (दि. 27) पासून तडीपार केले आहे. या पुढील कालावधीतही शेतकर्यांचे इलेक्ट्रिक मोटार व केबल चोरी करणार्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.
या आरोपींवर ठोस प्रतिबंधक कारवाई करून तडीपार करण्यासाठी शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, एकनाथ पाटील, अभिजित पवार, पोलिस हवालदार परशराम सांगळे यांनी कामकाज पाहिले.