पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील बेट भागात दिवसा उच्चांकी तापमान व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. कांदा पिकाबरोबर पालेभाज्या, फळभाज्या, फळपिके या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने पिकांच्या रक्षणासाठी शेतकर्यांना विविध उपाययोजना व महागडी औषध फवारणी करावी लागत आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापूर खुर्द, जांबूत, चांडोह, वडनेर आदी परिसरात दरवर्षीप्रमाणे शेतकर्यांकडून कांदा पीक, उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाबरोबरच टोमॅटो, वांगी, काकडी, मिरची, खरबूज, कलिंगड आदी उन्हाळी पिके घेतली जातात. बहुतांश शेतकर्यांनी फेब्रुवारीमध्ये या पिकांची लागवड केली आहे. अनेक शेतकरी लागवड करताना पाहयला मिळत आहेत.
दरम्यान, आठवडाभर पहाटे थंडी व दिवसा कडक तापमान असे विषम हवामान होते. आता तापमानाबरोबरच ढगाळ वातावरण असल्याने शेतातील पिकांवर पांढरी माशी तसेच रस शोषणार्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
हवामानातील लहरीपणामुळे शेतकर्यांचे पिकांचे नियोजन बिघडत असून, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांना पिकांवर महागडी औषध फवारणी करावी लागत आहे. सध्या मागास कांदा पिकावर मावा, तुडतुडे तसेच विविध रस शोषणार्या किडींचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने पिकांच्या रक्षणासाठी शेतकर्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. परिणामी शेतकर्यांच्या उत्पादनखर्चात मोठी भर पडत आहे.
वातावरणातील बदलाचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये, यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू असून, शेतात उत्पादन घेतलेल्या मालाला बाजारात अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा ठेवून शेतकरी उन्हाळी हंगामातील पिके घेताना पाहयला मिळत आहेत.