सुदाम गाढवे, भारत गाढवे Pudhari Photo
पुणे

Pune News|विहीरीत उतरलेल्‍या करंटने बापलेक जीवास मुकले : शिरुर तालुक्‍यातील साबळेवाडी येथील हृदयद्रावक घटना

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर : बापलेकांनी जिद्दीने उभारला होता दुग्‍धव्यवसाय

पुढारी वृत्तसेवा

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत बाप-लेकाचा विहीरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा समावेश आहे.

सुदाम गाढवे हे सकाळी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ लोटला तरी ते परत न आल्याने मुलगा भारत त्यांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला. त्याने वडिलांना पाण्यात पडलेले पाहून त्यांना वाचविण्यासाठी मित्राला हाक देत विहिरीत उडी घेतली; मात्र त्यालाही विजेचा जबर धक्का बसला. पाण्यात विजेचा करंट उतरल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला.

भारतच्या मित्राने बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. ग्रामस्थांनी वीजप्रवाह बंद करून बाप-लेकाला विहिरीतून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

गाढवे कुटुंब नगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून टाकळी हाजी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांनी दूध व्यवसाय उभारला होता. सध्या त्यांच्या कुटुंबाकडे दहा ते पंधरा जर्सी गाई असून दररोज शंभर लिटर दूध डेअरीला पुरविले जात होते. बापलेकाच्या अकाली निधनाने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायातील कार्यात अग्रेसर होते. ते टाकळीकर प्रासादिक दिंडीसोबत दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत असत. भजनी मालिकेचे त्यांना विशेष ज्ञान होते. मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी येथे अकरावीचा विद्यार्थी होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT