अभिजित आंबेकर
शिरूर : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या एमईपीएल या कंपनीच्या सोडलेल्या दूषित पाण्यामुळे ओढे-नाले हे तेलमिश्रित पाण्याने भरले असून, निमगाव भोगीवरून हेच दूषित पाणी ढोकसांगवी, फलकेमळा सरदवाडी शिरूर ग्रामीण भागात ओढ्याद्वारे जाते. या प्रवासात पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत प्रदूषित होत आहेत. शिरूर ग्रामीण हद्दीत हे पाणी आल्यानंतर शिरूर शहराला पाणीपुरवठा करणार्या हत्तीडोह पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी पोहचते. ज्या ठिकाणाहून हे पाणी सुरू होते, त्या ठिकाणी असलेले दगडगोटे, माती देखील प्रदूषित असून, त्यावरही थरच्या थर साचलेला पाहावयास मिळतो.
या पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला असता व याबाबत स्थानिकांशी थेट चर्चा केली असता काही गावांतून कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात मुलांचाही समावेश आहे. पोटाचे विकार होणे, किरकोळ आजार तर आहेतच; परंतु गंभीर आजारांची देखील मोठी दाहकता समोर येत आहे. एक पिढी त्रस्त झाली आहे, हे ठीक; परंतु नवजात बालकांच्या आरोग्यावर देखील होणारे परिणाम समोर येत आहेत.
शिरूर शहर दिवसेंदिवस वाढत आहे. यात उपनगरे मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना हे पाणी हत्तीडोह पंपिंग स्टेशनपर्यंत आले, तर हजारो लोकसंख्या असलेल्या उपनगरातील व शहरातील नळाद्वारे पाणीपुरवठा झाल्यास काय दुष्परिणाम होतील, याचा अंदाज न केलेला बरा. या कंपनीतून पावसाळ्यात पाणी सोडले जायचे. या सोडलेल्या पाण्यात 5 फुटांपर्यंत फेस असायचा, असेही काहींनी सांगितले.