शिर्सुफळ: शिर्सुफळ (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील वर्गखोली दुरुस्ती तसेच सुशोभीकरण करण्यासाठी पंचायत समिती बांधकाम विभागाकडून मोजमाप करून हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर शाळेसाठी लाखो रुपयांचा निधी मिळणार असून निविदा प्रक्रिया राबवून शाळेच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे शाखा अभियंता प्रशांत मिसाळ यांनी सांगितले.
या शाळेसाठी संगणक लॅब, ग्रंथालय, शाळेतील सर्व भिंतींना रंगरंगोटी व बोलक्या भिंती, शाळेच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक, विद्यार्थ्यांना जेवण बनवण्यासाठी किचन, वर्ग खोल्यांची डागडुजी, विद्यार्थ्यांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, विद्यार्थी व शिक्षकांच्या दुचाकीसाठी प्रशस्त पार्किंग करण्यात येणार असल्याचे या वेळी मिसाळ यांनी सांगितले.
शाळेत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी स्टेज बांधण्यात येणार आहे. शाळेमध्ये असलेल्या शौचालयाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शाळेच्या परिसरामध्ये परसबाग, झाडे लावण्यात येणार आहेत. शाळेमध्ये ये-जा करण्याकरिता शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकरिता प्रवेशद्वार बनविण्यात येणार आहे.
शाळेत बांधण्यात आलेल्या सभागृहाचे सुशोभीकरण
गेल्या दोन वर्षांपूर्वी शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यासाठी 100 ते 150 लोक बसतील एवढे सभागृह बांधण्यात आले होते. या सभागृहाच्या आतील भागाला सुशोभीकरण करणे तसेच इलेक्ट्रिक कामे करण्यात येणार आहेत. यामुळे सभागृहामध्ये उपक्रम घेण्यासाठी येणार्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेची मॉडेल स्कूल ही एक चांगली आणि दूरदृष्टीपूर्ण कल्पना आहे. या उपक्रमामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना संगणक, लायब्ररी आणि सुसज्ज भोजन कक्ष अशा आधुनिक सुविधा शिक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत. या वर्षीपासून शाळेत उइडए पॅटर्न लागू होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत होईल. शाळा व्यवस्थापन समिती हे काम अत्यंत दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. शाळेमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे शाळेच्या व गावाच्या वैभवात मोठी भर होणार आहे.- शीतल हिवरकर व संदीप खराडे, अध्यक्ष व उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती