संतोष वळसे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी डोंगरी पट्ट्यातील शिनोली-बोरघर जिल्हा परिषद गट यंदा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. आदिवासी व डोंगरी परिसर असल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी पाण्याची समस्या आहे. या भागात उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ही स्थिती वर्षानुवर्षे कायम आहे.(Latest Pune News)
गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग््रेासचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, वीज, शाळा, आरोग्य केंद्र यांसारखी विकासकामे झाली असली तरी या कामांना दर्जा नसल्याची आणि अनेक कामे अपुरी राहिल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. शासनाच्या विविध योजनांचा पूर्ण लाभ नागरिकांना मिळालेला नाही, असा आरोपही होत आहे.
दरम्यान, या गटावर वळसे पाटील यांच्याविरोधात एकसंघ लढा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करण्याची चर्चा सुरू आहे. त्यास कितपत यश मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीचे नेते संपर्कात असले तरी शासन निधी आणण्यात आणि ठोस विकास साधण्यात त्यांना अपयश आले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या या भागात जुन्नर-घोडेगाव मार्गे तळेघरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीचे कामकाज सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जात आहेत. त्यांना चांगला मोबदला देण्याचे आश्वासन मिळाले असले तरी ते प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, पाणीटंचाई, विकासकामांचा दर्जा, शासन योजनांचा अभाव आणि महामार्गामुळे होणारे नुकसान या सर्व मुद्यांवरून शिनोली-बोरघर जिल्हा परिषद गटाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग््रेास पक्षाच्या रूपा जगदाळे 10,301 मते मिळवून विजयी झाल्या. रुकय्या तांबोळी यांना 5354, ज्योती भालेराव 1370 तर दिपाली भास्कर यांना 559 मते मिळाली.
इंदूबाई लोहकरे, जनाबाई उगले, शैला लोहकरे, शैला आंबवणे, सुरेखा जढर, सविता कोकाटे,अनिता आढारी, कमल बांबळे, सविता दाते, शुभांगी साबळे, सुरेखा लोहकरे, ज्योती पारधी, अंजना तळपे.