दिवे; पुढारी वृत्तसेवा : शिखर शिंगणापूर येथील सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंगी घाटातील थरार, हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. यात्रेला राज्यभरातील भाविकांची गर्दी होत असते. यंदा फुरसुंगी (ता. हवेली) येथील भाविक बापूराव गुंड (वय 54) हे फुरसुंगी ते शिंगणापूर अशी उलटे चालत वारी करीत आहेत. गुंड यांच्या या वारीचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक केले जात आहे. तब्बल दीडशे किलोमीटर अंतर ते उलटे चालत पूर्ण करणार आहेत.
विशेष म्हणजे, या उलटे चालत वारीसाठी ते एकटेच निघाले आहेत. पुढे वाहनांचा अडथळा, रस्त्यावरील खड्डे हे सांगण्यासाठी कुणीही नाही. केवळ एका शिट्टीच्या आधारावर ते आपले मुक्कामाचे लक्ष्य पूर्ण करणार आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता आई तान्हूबाई गुंड यांचे आशीर्वाद, फुरसुंगी येथील तुळजा भवानीमातेच्या दर्शनानंतर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन ते निघाले. फुरसुंगी येथील शंभो महादेवाच्या मंदिरातही दर्शन घेतले.
सोमवारी सकाळी दहा वाजता ते दिवे येथे पोहचले. रमेश झेंडे व भरत झेंडे यांनी त्यांच्या नाष्ट्याची सोय केली. दिवे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच राजू झेंडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून पुढील वारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पोपट झेंडे, गुलाब झेंडे, राजेंद्र झेंडे, भाऊसाहेब सोनवणे, अनिल झेंडे, बाबूराव झेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिखर शिंगणापूरला आठवी वारी
गुंड यांच्या डोक्यावरील टोपीवर विविध सुविचार लिहिले आहेत. प्रवासात मतदान जागृती, वृक्षतोड थांबवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, ज्येष्ठांचा-गुरुजनांचा आदर करा, आपली एकता व अखंडता टिकविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा, असे अनेक संदेश लिहिले आहेत. शिखर शिंगणापूरला उलटे चालत जाण्याची ही त्यांची आठवी वारी आहे. यापूर्वीही त्यांनी फुरसुंगी ते दिल्ली तसेच आळंदी ते पंढरपूर 41 वार्या पूर्ण केल्या आहेत. कोल्हापूर एकवेळा, तर मंत्रालयात विविध विषय घेऊन ते सहावेळा उलटे चालत गेले आहेत.