मोबदल्यासाठी शेळगाव रस्त्याचे काम बंद Pudhari
पुणे

Road Construction: मोबदल्यासाठी शेळगाव रस्त्याचे काम बंद; शेतकऱ्यांचा इशारा – ‘आंदोलनाचा’!

शेळगाव–अकोले रस्त्याचे काम थांबले; भूसंपादन मोबदल्याविना काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

शेळगाव: इंदापूर तालुक्यातील शेळगाव ते शेळगाव पाटीदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम जमीन भूसंपादन मोबदला मिळालेला नसल्याने मागील काही दिवसांपासून बंद ठेवलेले आहे. जमीन भूसंपादनाचा मोबदला मिळाल्यानंतरच काम सुरू करावे, अशी भूमिका संबंधित शेतकऱ्यांनी घेतली आहे.  (Latest Pune News)

इंदापूर तालुक्यातील अकोले ते शेळगाव शेळगाव पाटी दरम्यानच्या रस्त्याला महाराष्ट्र स्टेट इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत काँक्रिटीकरणाला कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून रस्त्याचे अकोले ते शेळगावपर्यंत जागोजागी काम पूर्ण झालेले आहे. मात्र शेळगाव ते शेळगाव पाटी दरम्यान काही भागात रस्त्याच्या कामासाठी संपादित जमिनीचा कोणताही प्रकारचा मोबदला शासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे श्रीरंग शिंगाडे, अशोक शिंगाडे, गुलाब शिंगाडे, सागर भरणे, सुजाता शिंगाडे, सुभाष शिंगाडे, जयसिंग शिंगाडे, तानाजी शिंगाडे, बाळू शिंगाडे, रमेश शिंगाडे व पुष्पा शिंगाडे या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम काही दिवसापासून बंद पाडलेले आहे.

याबाबत ग्रामपंचायतचे सदस्य नीलेश शिंगाडे म्हणाले की, अकोले ते शेळगाव पाटी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम देसाई इन्फा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाले आहे. पूर्वीचा रस्ता 3.75 मीटर एवढ्या रुंदीचा होता. आता त्यात वाढ करून 12 मीटर रुंदी केली आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसताना रात्रीच्या वेळी या रस्त्याचे काम 16 मीटर रुंदीचे सुरू आहे. या रस्त्याच्या वाढीव रुंदीची शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही. तसेच पूर्व परवानगी न घेता या कामासाठी जमीन भूसंपादित केली असून त्याचा कोणत्याही प्रकाराचा मोबदला दिलेला नाही.

दरम्यान, जमीन भूसंपादन मोबदला मिळावा म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच महाराष्ट्र स्टेट इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महामंडळ पुणेचे कार्यकारी अभियंता व वालचंदनगर पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र त्यांच्याकडूनही अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनही छेडू, असाही इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT