संतोष ननवरे
शेळगाव: इंदापूर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या संकल्पनेतून व सरपंच ऊर्मिला लक्ष्मण शिंगाडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून ग्रामसभेद्वारे गावात फ्लेक्सबंदीचा निर्णय मागील काही महिन्यांपूर्वी घेतला. त्याची अंमलबजावणी 100 टक्के सुरू असून, फ्लेक्सबंदी झाल्यानंतर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत डिजिटल स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आली आणि या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात डिजिटल स्क्रीन बसवून नवीन उत्पन्नाचे साधन तयार करणारी शेळगाव ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असून, फ्लेक्सबंदीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी सांगितले की, डिजिटल स्क्रीन बसविण्यापूर्वी गावातील मुख्य चौकात व इतर शाळा, संत मुक्ताबाई मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर ठिकाणी विविध प्रकारचे फ्लेक्स लावलेले असायचे.
ठरावीक ठिकाणी फ्लेक्स लावण्याच्या स्पर्धेतून वाद निर्माण व्हायचे. हाणामारी, पोलिस तक्रार असे प्रकार होत होते व गावाचे विद्रुपीकरण होत होते. या सर्वांवर उपाय म्हणून सरपंच ऊर्मिला लक्ष्मण शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय घेऊन संपूर्ण गावात सक्तीची फ्लेक्सबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला व त्याची 100 टक्के अंमलबजावणी गावामार्फत व ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. फ्लेक्सबंदी केल्यानंतर कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी करणारे शेळगाव हे आदर्शवत गाव ठरले आहे.
फ्लेक्सबंदी केल्यामुळे ग्रामपंचायतीसाठी एक नवीन उत्पन्नाचे साधन तयार झाले व इतरत्र फ्लेक्स लागण्याचे बंद झाल्यामुळे गावातील ताण-तणाव कमी करण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाच्या साधनाबरोबरच गावातील लोकांचे देखील फ्लेक्स, बॅनर बनवण्यावर होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.
फ्लेक्सबंदीची गावात 100 टक्के अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीसाठी उत्पन्नाचे नवीन साधन तयार करणारी शेळगाव ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. भविष्यात ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याकरता अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.- चंद्रकांत जगताप, ग्रामपंचायत अधिकारी, शेळगाव
शेळगाव ग्रामपंचायतीने घेतलेला फ्लेक्सबंदीचा निर्णय हा अतिशय स्तुत्य आहे. याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने देखील त्याची अंमलबजावणी करून शेळगाव ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करावा.- सचिन खुडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती इंदापूर