शहरातील जुन्या प्रभात ब्रास बँडचे संचालक, अनेक वर्षे बँड पथकामध्ये वादन करणारे कलाकार आणि ज्येष्ठ सिंथेसायझर वादक गजानन उर्फ शेखर सोलापूरकर (वय 64) यांचे हृदयविकाराने निधन झाले. प्रभात ब्रास बँडचे संस्थापक स्वर्गीय बंडोपंत सोलापूरकर यांचे शेखर हे पुत्र होत. बँडवादन कलेत त्यांनी अनेक कलाकार तयार केले.
बँड पथकामध्ये पट्टीतरंग, क्लॅरोनेट आणि सिंथेसायझर वादन करण्यामध्ये सोलापूरकर यांचा हातखंडा होता. गांधर्व महाविद्यालयातून संवादिनी वादनाचे शिक्षण घेतलेल्या शेखर यांनी वडील सूरमणी बंडोपंत यांच्याकडून क्लॅरोनेट वादनाची कला आत्मसात केली. बँडवर भक्तिगीत, भावगीत, राष्ट्रभक्तीपर गीत तसेच शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीत वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी काही काळ पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये राम किंकर यांच्यासाठी संगीत संयोजनाचे काम केले होते. गणेशोत्सवात मानाचा पहिला श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीत शेखर सोलापूरकर यांनी 56 वर्षे आपली सेवा अर्पण केली. त्याचबरोबर आषाढी वारीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसमोर त्यांनी अनेकदा वादन केले होते.