पुणे

टाकळीहाजी : बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी मृत्युमुखी

अमृता चौगुले

टाकळीहाजी; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील माळवाडी येथे पंढरीनाथ भाकरे यांच्या मेंढीवर मंगळवारी (दि. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढीचा मृत्यू झाला. भाकरे यांची दोन मुले प्रेम व सौरभ हे नदीच्या कडेला मेंढ्या चारत असताना अचानक त्यांच्यासमोरच बिबट्याने कळपातील एक मेंढी उचलून बाजूला असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली.

त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच असलेले अतिष भाकरे आणि गणेश व्यवहारे यांनी तिकडे धाव घेतली. उसाच्या बाजूला सर्वांनी पळत जाऊन बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने मेंढी उसाच्या शेतात सोडून दिली, परंतु, मेंढीच्या मानेला चावा घेतल्यामुळे मोठी जखम झाली होती. काही वेळातच या मेंढीचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचार्‍यांना कळविल्यानंतर पंचनामा करण्यात आला.
मंगळवारी दुपारीच माळवाडी येथून जवळच असलेल्या होनेवाडी येथे बिबट्याचा बछडा उपासमारीने मृत झाल्याची घटना घडली असतानाच तेथून काहीच अंतरावर मेंढीवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

SCROLL FOR NEXT