समाजाची सेवा अन् कला, क्रीडांना प्रोत्साहन हेच ध्येय  File Photo
पुणे

Ganesh Chaturthi: समाजाची सेवा अन् कला, क्रीडांना प्रोत्साहन हेच ध्येय

गुलटेकडी मार्केट यार्डातील शारदा-गजाजन मंडळ ठरतेय एक आदर्श

पुढारी वृत्तसेवा

Sharada Gajanan Mandal Gultekdi

पुणे: शेतकर्‍यांसाठी मोफत तर कष्टकर्‍यांसाठी अल्पदरात जेवण, गरजू विद्यार्थी-विद्यार्थिंनींकरिता शैक्षणिक मदत, अनाथ मुलांकरिता मामाच्या गावची सफर, रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रमांपासून जंगी कुस्त्यांचा आखाडा, दहीहंडी उत्सव, जिल्हास्तरीय कबड्डी तसेच ढोल-ताशा स्पर्धा आदी कला, क्रीडांना प्रोत्साहन देण्यास कायम पुढे असलेले मंडळ म्हणजे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील श्री शारदा गजानन मंडळ. आपल्या कामातून मंडळाने एक वेगळी वाट शोधत सर्व मंडळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

गुलटेकडी मार्केट यार्ड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1979 साली करण्यात आली. संस्थापक मुरलीधर पंढरीनाथ घुले यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने वाटचाल सुरू केली. Ganesh Chaturthi

पर्यावरणपूरक गणेशोत्सव असावा या दूरद़ृष्टीतून एम. पी. घुले यांनी कर्नाटक येथील मूर्तीकार शिल्पी यांच्याकडून कागद व शाडूपासून मूर्ती घडविली. पूर्वी बाजार समितीच्या गोल इमारत व त्यानंतर जवळील गाळ्यावर मूर्ती स्थापित करण्यात येत होती. त्यानंतर 2010 साली तत्कालीन संचालक व संस्थापक अध्यक्ष गणेश घुले यांच्या सहकार्यामुळे दगडी गाभार्‍यासह सभामंडप जवळपास आठ गुंठ्यात उभारण्यात आला.

सद्य: स्थितीत राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशापूर्वीच मंडळांनी पर्यावरणाचा विचार करून फायबरची मूर्तीही घडविली. गणेशोत्सव काळात दरवर्षी श्रींना सत्यजित झेंडे यांच्याकडून फळांची तर राजेंद्र सूर्यवंशी यांच्याकडून भाजीपाल्याची आरास केली जाते.

दिव्यांगांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ, बाजार घटकांचे मनोरंजन व्हावे व त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजावी या उद्देशाने महाराष्ट्राच्या लोकधारा, कीर्तन, भारूड, भजन, पोवाडे तसेच विविध व्याख्यानपर कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येते.

राबविलेले उपक्रम

  • गोरगरिबांसाठी दर शुक्रवारी अल्पदरांमध्ये कपडे विक्री

  • महिन्याला दहा हजार लोकांसाठी अन्नदान सोहळा

  • प्रतिलिटर एक रुपया दराने शुद्ध फिल्टर थंड पाणी

येत्या काळात मंडळामार्फत वृद्धाश्रमाची स्थापना करून वयोवृद्धांना न्याय देणे, अनाथ आश्रमाची स्थापना करून पालकत्त्व स्वीकारणे तसेच सर्वांसाठी मोफत डायग्नोस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅबची उभारणी करण्याचा मानस आहे.
- सागर भोसले, माजी अध्यक्ष व समन्वयक, श्री शारदा गजानन मंडळ (मार्केट यार्ड).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT