file photo 
पुणे

‘होमपिच’वर संघटनाबांधणीचे शरद पवारांसमोर आव्हान!

दिनेश चोरगे

बारामती :  राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर बारामतीत सगळीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच गटाचे प्राबल्य दिसून येत आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्या ना पदाधिकारी ना कार्यकर्ते, अशी स्थिती आहे. ज्या बारामतीतून शरद पवार यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली, त्या 'होमपिच'वर त्यांना पक्षसंघटनेच्या बांधणीचे मोठे आव्हान उभे आहे. बारामती तालुक्यात अजित पवार यांचा असलेला दबदबा पाहता ते कितपत शक्य होईल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या खासदारकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. येथे मिळणाऱ्या लाखाच्या वर मताधिक्यामुळेच त्या खासदार होतात, ही वस्तुस्थिती आहे. सध्या बारामतीतील प्रत्येक संस्था, संघटना आणि पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अजित पवार सत्तेत असताना येथे पक्षबांधणी करणे शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासाठी ठीण बनले आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार तब्बल ६५ दिवसांनी शनिवारी (दि. २६ ऑगस्ट) बारामतीत आले. या वेळी त्यांचे जे अभूतपूर्व स्वागत झाले, त्यातून योग्य तो संदेश शरद पवार व सुळे यांच्यापर्यंत पोहोचला असावा. प्रचंड शक्तिप्रदर्शन त्यातून केले गेले. तालुक्यातील माळेगाव व सोमेश्वर साखर कारखाना, बारामती दूध संघ, बारामती सहकारी बँक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, यांसह सर्वच छोट्या-मोठ्या संस्था अजित पवार यांच्या आधिपत्याखालीच चालतात. सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून तीनदा लोकसभा गाठली. या मतदारसंघात सहा विधानसभांचा समावेश आहे. अन्य तालुक्यांत सुळे यांनी दौरे करून काही अंशी स्वतःचे संघटन तयार केले. बारामतीचा विषय आला की ताईंनी आजवर, 'बारामतीचे बघायला दादा खंबीर आहे, त्यामुळे मला येथे विशेष लक्ष घालायची गरज नाही', अशी भूमिका घेतली. आता बदललेल्या परिस्थितीत त्यामुळे दादा बाजूला गेल्यानंतर सुळे यांनाच लोकसभेत प्रवेश करणे येथून जड जाईल, अशी चिन्हे आहेत. गत आठवड्यात सुळे यांनी बारामतीचा दौरा केला. परंतु, राष्ट्रवादीतील फक्त एक- दोन पदाधिकारी त्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले. एकूणच, सुळे यांना लोकसभेत मोठ्या मताधिक्याने पाठविणाऱ्या बारामती विधानसभेत सध्या तरी त्यांच्यापुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

फुटीनंतर पार्थ, जय अॅक्टिव्ह

गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या वाट्याला पराभव आल्यानंतर ते राजकारणापासून काहीसे दूर गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी बारामतीत आल्यानंतर मात्र ते संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी झाले. मिरवणुकीपासून ते व्यासपीठावरील कार्यक्रमात ते तीन तास त्यांच्यासोबत होते. यापाठोपाठ मंगळवारी (दि. २९) अजित पवार यांचे दुसरे जिरंजीव जय यांनीही बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. एरवी हे दोघे बारामतीच्या राजकारणापासून अलिप्तच होते. परंतु, बदललेल्या राजकीय स्थितीनंतर हे दोघेही भाऊ बारामतीत अॅक्टिव्ह झाले आहेत.

'..तुम्ही अजितला भेटा' चा परिणाम

राष्ट्रवादी एकसंध असताना शरद पवार यांनी बारामतीत लक्ष कमी केले. एखादी व्यक्ती त्यांच्याकडे गेली तरी, 'मी स्थानिक विषयात पडत नाही, तुम्ही अजितला भेटा', असे शरद पवार सांगत. परिणामी, जिल्हा बँकेपासून ते सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या सर्व ठिकाणी अजित पवार यांनी आपले समर्थक आणून आपली पकड जमवली आहे. कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद दिली. अनेक छोट्या ठेकेदारांना बलाढ्य केले. गावोगावी स्वतःला मानणारा मोठा वर्ग निर्माण केला. त्याचा परिणाम म्हणून शरद पवार यांच्याकडे सध्या येथे कार्यकर्त्यांची वानवा दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT