पुणे

पुणे : आंदोलनातून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  परीक्षा पद्धतीमधील बदल 2025 पासून लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास भेट दिली. या वेळी एमपीएससी उमेदवारांच्या मागण्या योग्यच आहेत, आपण त्यांच्या पाठीशी आहोत. या उमेदवारांच्या शिष्टमंडळासह दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. तुम्ही उपोषण मागे घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या उमेदवारांना केले. पण, या उमेदवारांनी आंदोलक कोअर टीमशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली.

बालगंधर्व रंगमंदिर चौकात गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेटी देत पाठिंबा दिला. याप्रसंगी हजारो उमेदवारांनी उपस्थिती लावत सरकारचे लक्ष वेधले. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावत विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली.  पवार म्हणाले, एका विद्यापीठाचे कुलगुरू मला भेटायला आले होते. एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याची माहिती त्यांनी मला दिली. या बदलांविरोधात कृषी विद्यापीठातील हे परीक्षार्थी 26 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

याप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावे. त्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे तुमची बाजू मांडणे आवश्यक आहे, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणार्‍या उमेदवारांपैकी पाच जणांचे शिष्टमंडळ पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यास तयार झाले आहे.

खुर्ची नाकारत उभे राहून संवाद…

शरद पवारांच्या आगमनानंतर आंदोलकांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या वेळी शरद पवारांना विद्यार्थ्यांनी जागा करून दिली आणि शरद पवार विद्यार्थी आंदोलनाच्या मधोमध पोहोचले. त्या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांना खुर्ची देऊ केली, पण पवारांनी ती नाकारली आणि उभे राहून संवाद साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT