शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. या तालुक्याचा नावलौकिक खूप चांगला होता. येथून अनेक चांगले खासदार, आमदार निवडून गेले. पण आमची चूक झाली व तीन टर्म आम्ही येथील नेतृत्वाला निवडून दिले. आता ही चूक करू नका. तालुक्याला, जिल्ह्याला प्रकाशाची वाट दाखविण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी बाबाजी काळे यांच्या हातात मशाल दिली असून, 20 नोव्हेंबरला मशालीसमोरील बटण दाबून परिवर्तन घडवून आणा, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले.
हुतात्मा राजगुरू, निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान लोकांमुळे खेड तालुकाचा नावलौकिक देशाच्या कानाकोपर्यात पोहचला. पण येथील नेतृत्वाने दहशतवाद व दमदाटी करत तालुक्यातील सर्व उद्योगधंदे करणाऱ्यांना हैराण करत दूषित वातावरण निर्माण केले. पण बाबाजी काळे यांच्या रूपाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सुसंस्कृत नाव आमच्यापुढे आले. त्यामुळे उध्दव ठाकरे आणि आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले.
खेड-आळंदी विधानसभेचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, सचिन अहिर, अशोक खांडेभराड, भगवान वैराट, मनीषा गोरे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे यांच्यासह सर्व पदाधिकारी, नेते व्यासपीठावर हजर होते.
या वेळी सचिन अहिर यांनी सांगितले, तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत संभ्रम होता पण आता सर्व एकसंघ झाले असून, परिवर्तन नक्की होणार आहे. कारण राज्याचा तरुण संघर्षयोध्दा शरद पवार यांचा आशीर्वाद आपल्या उमेदवाराला मिळाला आहे. येथील आमदाराला मंत्रिपदाचे डोहाळे लागले असून, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेत येणार असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
दरम्यान शरद पवार यांची सभाच होऊ नये म्हणून आमदाराने अनेक प्रयत्न केले. कारण शरद पवार यांची सभा झाली तर आपला पराभव निश्चित होणार हे त्यांना माहिती आहे. खेड तालुक्यात आजही शरद पवार व उध्दव ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. शरद पवार यांचे पाऊल माझ्या सभेला लागले, तिथेच माझा विजय निश्चित झाल्याचा विश्वास बाबाजी काळे यांनी व्यक्त केला.