बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे उजनी धरणातील डेटा सेंटर नकोच अशी भूमिका घेऊन आंदोलन करत असतानाच, या प्रकल्पाबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
आज, रविवारी (दि. १) बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार या एआय प्रकल्पाबाबत म्हणाले, "प्रकल्प आला म्हणजे पाणी गेले, असे नाही; मात्र उपलब्ध पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेणार असून, काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबत योग्य तो विचार केला जाईल." शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे एआय डेटा सेंटरबाबत त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय, असा संभ्रम निर्माण होत आहे.
"केंद्र सरकारने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक होते; परंतु तसा निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे आज दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. सुप्रिया सुळे या बैठकीत सहभागी होतील. मात्र, सध्या माझे सर्व लक्ष राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या प्रश्नावर केंद्रित आहे," असेही पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, "राज्यात पाणीटंचाई व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. मी दुष्काळी भागातील परिस्थितीची माहिती घेत आहे. अशा संकटाच्या काळात कोणीही राजकारण आणू नये. सर्वांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे असून दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे."
यंदाच्या दिवाळीबाबत विचारले असता, "यंदा आमच्याकडे दिवाळी नाही, यावेळी आम्ही दिवाळी साजरी करणार नाही," असे पवार यांनी स्पष्ट केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.