Sharad Pawar Pudhari
पुणे

Sharad Pawar: गांधी, नेहरूंच्या विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते; उल्हास पवारांबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आयुष्यभर कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवारांनी विचारांची बांधिलकी जपली. राजकारणात राहूनही सर्व पक्षांशी सुसंवाद राखण्याचे काम केले. गांधी, नेहरूंच्या विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी काढले. (Latest Pune News)

सॅटर्डे क्लबतर्फे उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, गहिनीनाथ औसेकर, धीरज देशमुख, अनुराधा पवार आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, उल्हास पवारांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काम केले आहे. गांधी-नेहरूंचे विचार देशाला एकत्र ठेवतील, हे सूत्र त्यांनी स्वीकारले आहे. ते अखंडपणे सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच शरद पवारांनी उल्हास पवार यांच्यासोबत मुंबईतील टिळक सभागृहात एकत्र ऐकलेली भाषणे आणि किस्सेसुद्धा सांगितले.

पवार म्हणाले, घर, संसाराचा विचार न करता नेहरूंनी आपला उमेदीचा काळ देशासाठी दिला. देश एकसंध ठेवून शांतता प्रस्थापित केली. प्रगतशील राष्ट्र घडवण्यासाठी पंचशील विचार देशाला दिला. त्या नेहरूंच्या नावाचा उल्लेख देशाचे नेतृत्व लाल किल्ल्यावरील भाषणात करीत नाहीत, त्यामुळे मी अस्वस्थ होतो आणि चिंता वाटायला लागते. या देशात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर गांधी-नेहरूंचा विचार स्वीकारून तो जपला पाहिजे. थोरात म्हणाले, उल्हास पवार हे राजकारणातील ज्ञानकोश आहेत. त्यांनी समाजातील आदरस्थान कायम टिकवले आहे. डॉ. अरुणा ढेरे, गहिनीनाथ औसेकर, धीरज देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

आयुष्यभर माणसे जोडली. मात्र, आज अडाणी लोकांपेक्षा शिकलेल्या लोकांची भीती वाटत आहे. शिकलेले राजकारणी सभागृहात शिव्या देत आहेत. नेहरू, अटलबिहारी, वाजपेयींसारखे विरोधकांना दाद देणारे पंतप्रधान पाहिले आहेत. खर्‍या अर्थाने देशाला समन्वय साधणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. सर्वच क्षेत्रांतील पावित्र्य संपले आहे. मूल्यांची घसरण होत आहे. राजकारण्यांनी ‘संयम’ हा शब्द गुंडाळला आहे. त्यामुळे देशात निकोप आणि प्रगल्भ लोकशाही राहिली आहे का?
- उल्हास पवार, ज्येष्ठ नेते, कँाग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT