Sharad Pawar on party split
पुणे : पक्षफुटीची चिंता नको,आपला पक्ष जे लोक सोडून गेले त्यांच्याकडे पाहू नका, जिल्हा पातळीवर काम करण्यासाठी आता नव्या चेह-यांना संधी द्या. पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पन्नास टक्के महिलांना संधी देण्यात येईल.त्यामुळे जोमाने कामाला लागा. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पुणे येथे केले.
पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,अनिल देशमुख,राजेश टोपे,फौजिया खान,ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील,खासदार अमोल कोल्हे,निलेश लंके, हर्षवर्धन पाटील,शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला कार्यकत्यांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी सर्वच प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. शेवटी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाची सर्वजण आतूरतेने वाट पाहत होते. कार्यकर्त्यांचा आधार घेत पवार भाषणासाठी उभे राहताच घोषणांनी सभागृह दाणाणून गेले.
पवार यांनी हळूवारपणे मुद्देसूद भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, पक्ष फुटीची चिंता करु नका,जे सोडून गेले त्यांच्याकडे पाहू नका.आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यात होतील. त्यावर लक्ष केंद्रीत करा.माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर,आर पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री व पक्षाचे नेते अनिल देशमुख,राजेश टोप,जितेंद्र आव्हाड यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी तारीफ केली.मात्र अजित पवार यांचा उल्लेख टाळला.
ते म्हणाले,जेव्हा मी स्वतंत्र पक्ष उभा केला तेव्हा सोबत फक्त सहाजण होते. सत्यातील एक कमलकिशोर कदम आता इथे आहेत.सहा महिन्यांत आपण राज्यात सत्तेत आलो.आर.आर. पाटील यांना त्यांनी कसे शोधून काढले तो किस्सा त्यांनी सविस्तरपणे सांगितला. ते म्हणाले मी सामान्य कार्यकर्त्याला मोठे केले. त्यामुळे जनेतेचा गेली 26 वर्षे आपल्या पक्षाला चांगला पाठींबा मिळाला आपण सलग पंधरा वर्षे सत्तेत राहिलो. ते जनतेच्या प्रेमामुळे.
पवार यांनी सांगितले की,ऑपरेशन सिंदूर मध्ये दोन महिला अधिका-यांनी नेतृत्व केले. त्याचा अभिमान वाटतो,या प्रसंगात सरकारला सर्वपक्षांनी मतभेद बाजूला ठेवत मदत केली. विदेशात जावून त्यांनी देशाची बाजू ताकदीने मांडली.मात्र पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता ते म्हणाले, सध्याचे पंतप्रधान वेगळयाच पध्दतीने काम करीत आहेत.शेजारच्या राष्ट्रांशी आपले संबध चांगले नाहीत.चीन,पाकिस्तान,बांगलादेश आणि श्रीलंका या देशासोबत प्रेमाचे संबंध नाहीत.या उलट माजी पंतप्रधान पंडीत नेहरु यांच्या कार्यकाळत शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले होते.
पवार म्हणाले,आपल्या पक्षात आता महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.आता पुढील दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील.त्यात तिकीट वाटप करताना ही सुरुवात केली जाईल.सत्तेची चिंता करु नका, ती येत जात राहते.पक्षाचे काम करीत रहा. खंबीर रहा,हातात हात घालून काम करा.हजारो तरुण कार्यकर्ते राज्यात आहेत.त्यांना संधी देण्याची गरज आहे असे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला.