Political News: दरवर्षी बारामतीतील गोविंदबागेतील दीपावली पाडवा चर्चेत असतो. पक्षफुटीनंतर यंदा बारामतीत पवार कुटुंबीयांकडून स्वतंत्रपणे दीपावली पाडव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रथेनुसार गोविंदबागेत नागरिकांना भेटणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काटेवाडीतील पवार फार्म येथे पाडव्याच्या दिवशी नागरिकांना भेटतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर गतवर्षी गोविंदबागेतील पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहिले नव्हते. परंतु, त्यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाचे आयोजनही केले नव्हते. यंदा मात्र त्यांनी पाडव्यासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बारामतीतील दीपावली पाडव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असते. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांचा पाडवा कसा साजरा होणार याकडे यंदाही लक्ष लागले आहे. दीपावली पाडव्याला पवार कुटुंबीय एकत्र जमतात, शुभेच्छा स्वीकारतात. यंदा मात्र पक्षफूट व त्यानंतरची राजकीय स्थित्यंतरे पाहता दोन वेगवेगळे कार्यक्रम झाले.
गोविंदबागेतील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार हे उपस्थित हो. तर काटेवाडीतील पवार फार्म येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होते.
बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानी जागा कमी पडेल त्यामुळे काटेवाडीत भेटण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती दौर्यात सांगितले.