बारामती : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळासाठी बागायती जमिन वाचवून प्रकल्प कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, त्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवू अशी माहिती ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी दिली. बारामतीत पत्रकारांशी बोलताना खा. पवार म्हणाले, पुण्यासाठी एक विमानतळ गरजेचे आहे. त्यासाठी पुरंदरमधील काही गावे निवडण्यात आली आहेत. परंतु हा भाग बदलला आहे. माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना या भागासाठी एक सिंचन योजना राबवली गेली. त्यामुळे तो भाग बागायती झाला. आता त्या भागामध्ये फळबागा, ऊस व अन्य पिकांचे क्षेत्र वाढले आहे. शेती क्षेत्र सुधारले असल्याने जमिनी देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. याचा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेणार आहे. सध्या तरी एमआयडीसीला जागेच्या संबंधी भूमिका घेण्याच्या सूचना दिलेल्या दिसत आहेत. यासंबधीचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र, राज्य व स्थानिक लोक या तिघांशी बोलावे लागेल.
माझा प्रयत्न असेल की खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरमधील स्थानिक लोक व कार्यकर्ते यांची मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेवून मार्ग काढता येईल का हे पाहणार आहे. शक्यतो जे बागायती क्षेत्र आहे ते वाचवणे शक्य आहे का याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच वास्तव चित्र सांगता येईल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका सांगण्यासाठी केंद्राने स्थापलेल्या शिष्टमंडळावर खा. संजय राऊत यांनी टीका केली होती. यासंबंधी पवार म्हणाले, यापूर्वी नरसिंह राव पंतप्रधान असताना युनोमध्ये महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात गेले होते. त्यात माझा सहभाग होता. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते. हे जसे नरसिंह रावच्या कालावधीत झाले तसेच आज होत आहे. केंद्राने आठ की नऊ शिष्टमंडळे केली आहेत. काही देश वाटून दिले आहेत. पहेलगाम दहशतवादी हल्ला व पाकिस्तानचे उद्योग यासंबंधी ही शिष्टमंडळे देशाची भूमिका मांडणार आहेत. राऊत यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचा एक सदस्य शिष्टमंडळात आहे. इथे स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे.