पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केल्याने पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडून पेढे वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह कार्यकारिणीने राजीनामा दिला होता.
शुक्रवारी पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर शहर राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येत 'देश का नेता कैसा हो… पवारसाहेब जैसा हो' अशा घोषणा देत संपूर्ण राष्ट्रवादी भवनचा परिसर दणाणून सोडला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर दीपक मानकर, दत्ता सागरे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे, सुषमा सातपुते, समीर शेख, संदीप बालवडकर, कुलदीप शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी रात्री पुण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके वाजवून त्यांचे जंगी स्वागत केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पवार यांना पुष्प दिले. यावेळी पवार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि आमदार रोहित पवार होते.