शरद पवार-हर्षवर्धन पाटील  
पुणे

इंदापुरात शरद पवार-हर्षवर्धन पाटील यांचा एकत्रित बॅनर

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खा. शरद पवार व भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा एकत्रित बॅनर इंदापुरात लावण्यात आला आहे. बॅनरवरील तुतारी चिन्ह व 'इंदापूर तालुक्यातील जनतेची झाली, तयारी हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी!' असा असलेला उल्लेख यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पाटील आता तुतारी हाती घेणार का? याची चर्चा रंगू लागली आहे.

इंदापूर शहरातील जुन्या काँग्रेस भवन समोर रविवारी (दि. 8) हा फलक लागला. या फलकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मागील काही दिवसात हर्षवर्धन पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी पाटील यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. 7 सप्टेंबर रोजी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आपण महायुतीतच आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, रविवारी शहरात 'तुतारी'च्या फलकामध्ये आता त्यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होतो की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे शरद पवार यांच्याबरोबर फलक शहरात लागले होते.

इंदापूर शहरात लागलेल्या फलकाने कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी देखील पाटील यांनी हाती तुतारी घ्यावी, अशी मागणी केली. त्यांनी विधानसभा न लढवता विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा देखील काही समर्थकांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT