Pune, Pimpri-Chinchwad election | मित्रांना कात्रजचा घाट, पुतण्याशी बांधली गाठ File photo
पुणे

Pune, Pimpri-Chinchwad election | मित्रांना कात्रजचा घाट, पुतण्याशी बांधली गाठ

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पवारांचे जुळले; युतीचे घोडे अडले

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना कात्रजचा घाट दाखवत शरद पवार यांनी पुतण्याशी गाठ बांधली आणि पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही महापालिकांत शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे अखेर जुळले असून, मंगळवारी (दि. 30) यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा अखेरचा दिवस उजाडला तरी पुण्यातील निवडणुकीचे चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत जागावाटपाचा तोडगा न निघाल्याने युतीबाबत अद्याप साशंकता कायम आहे; तर दुसरीकडे काँग्रेस - शिवसेना ठाकरे गटात सुरू असलेले जागावाटप जेमतेम शंभर जागांपर्यंत पोहोचले. या सगळ्या गोंधळात एकाही राजकीय पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसल्याने इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि शहरांच्या विकासासासाठी राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे आम्ही या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले होते. त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. सोमवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही, बलाढ्य शक्तीविरोधात लढायचे असेल तर मनपा निवडणुकीसाठी एकत्रच निवडणूक लढवावी लागेल, असे सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जागा वाटपाची अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र पवार गटाचे नेते दिवसभर अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी चर्चेसाठी थांबून होते. मात्र, नक्की कोण किती जागा आणि कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार यासंबंधीचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार गट 125 जागा लढविणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा सोडल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच एका प्रभागात ज्या पक्षाकडे जास्त जागा जातील, त्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. उदा. प्रभाग 1 मध्ये जर घड्याळाचे तीन व तुतारीचा एक असेल तर सर्वच्या सर्व चारही जागांवर घड्याळ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट

पुण्यातील युती व आघाडीतील जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी या शिवसेनेला केवळ 15 जागा सोडण्याची तयारी दर्शविली. तर शिवसेनाही 25 जागांवर अडून बसल्याने युतीचा निर्णय होऊ शकला नाही. त्यातच शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यासह काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत भाजपवर दबाव टाकला. मात्र, पवारांकडून धंगेकरांना ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने ही केवळ सदिच्छा भेट ठरली. युतीचा हा गोंधळ सुरू असतानाच भाजपने जवळपास शंभरहून अधिक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. मात्र, अनेक प्रभागांमध्ये नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यासंबंधीची चुरस कायम असल्याने अनेक जागांवरील एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले नव्हते.

काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटातही पहिल्या टप्यात 100 जागांची वाटणी असून त्यामधील 60 जागा काँग्रेसला तर उर्वरित 45 जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्याचे ठरले असल्याचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील व ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी सांगितले. याशिवाय उर्वरित 60 जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार्‍या जागांमधून मनसेला जागा सोडल्या जाणार आहेत. मनसेने त्यासाठी 32 जागांची यादी दिली असून त्यामधील 21 जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. याशिवाय काँग्रेसकडे वंचितचा प्रस्ताव आला असून त्यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच सोमवारचा दिवस राजकीय घडामोडीचा ठरला. मात्र, तरीही सोमवारी रात्री उशिरापर्यंत युती, आघाडी यांच्यातील चित्र स्पष्ट होऊ शकले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT