पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. या दोघा नेत्यांची एकाच कार्यक्रमाला उपस्थिती ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
याआधी बारामती येथील कृषी प्रदर्शनादरम्यान काका आणि पुतणे एकत्र दिसले होते. त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्र आले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दोन्ही नेते एकमेकांना भेटले. आज अजित पवार प्रेसिडेंट लिहिलेल्या केबिनमध्ये जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी काका- पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण दोघांत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
त्यानंतर व्यासपीठावर दोन्ही नेत्यांच्या आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला. दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांशेजारी बसणे टाळले. याआधी अजित पवार आणि शरद पवार यांच्या खुर्च्या एकमेकांशेजारी ठेवण्यात आल्या होत्या. त्यात बदल करून अजित पवार आणि जयंत पाटील एकमेकांशेजारी बसले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे दिले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली. पुढे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली.