पुणे

Crime news : मशीनचे साहित्य चोरणार्‍यांना बेड्या

अमृता चौगुले

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील पेप्सीको इंडिया होल्डिंग प्रा. लि. कंपनीतील स्टोअर रूममधील खिडकीचा कोयंडा तोडून 11 लाख 20 हजार 980 रुपये किमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणार्‍या मशीनचे साहित्य दि. 19 ते 20 डिसेंबरदरम्यान चोरीस गेले होते. सदर प्रकरणी कंपनीच्यावतीने प्रवीण अशोक बारी (सध्या रा. शिरूर, ता. शिरूर, मूळ रा. शिंदोणी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये चोरीचा माल विकत घेणार्‍याचादेखील समावेश आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र तपास पथकाची नेमणूक करून त्यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस जवान विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी औद्योगिक वसाहतीमधील व कारेगाव परिसरातील 30 ते 40 ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून संशयितांचा माग काढला. त्याआधारे पोलिसांनी विजय पांडुरंग पाटील (वय 36, रा. मोरगाव खुर्द, ता. रावेत, जि. जळगाव), भूषण संतोष मिस्त्री (वय 29, रा. निंभोरा, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि मुकेश पिरमू ध—ुवे (वय 29, रा. चंदनगाव, ता. जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश, तिघेही सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांना मंगळवारी (दि. 26) अटक करण्यात आलेली असून, शिरूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांनी चोरलेले साहित्य हे सुनिल मांगीलाल महाजन (वय 48, रा. अमरदिप सोसायटी, कारेगाव, ता. शिरूर) यास विक्री केले असून त्यालादेखील गुरुवारी (दि. 28) अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 11 लाख 20 हजार 980 रुपयांचे मशीनचे साहित्य व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस जवान उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, माणिक काळकुटे यांनी केली.

SCROLL FOR NEXT