पुणे

पुणे : लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाला बेड्या; बार असोसिएशनच्या अध्यक्षावरही गुन्हा

अमृता चौगुले

पुणे/जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात कलमवाढ रोखण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणार्‍या जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षावर आणि जुन्नर पोलिस ठाण्याचा प्रोबेशनरी पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्याचा पोलिस उपनिरीक्षक अमोल साहेबराव पाटील (32) याला एसीबीकडून अटकही करण्यात आली आहे. तर, गुन्हा दाखल झालेल्या जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षाचे नाव अ‍ॅड. केतनकुमार पडवळ आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात 2021 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपास मंजुरीसाठी वरिष्ठांकडे दाखल केला होता. परंतु, या गुन्ह्यातील त्रुटींमुळे तपासाची फाईल परत पोलिस ठाण्याला पाठविण्यात आली. या दरम्यान उपनिरीक्षक शिंदे यांची बदली झाली. नंतर हा गुन्हा उपनिरीक्षक अमोल पाटील याच्याकडे तपासासाठी आला.

या प्रकरणात त्याने तक्रारदारांचा जबाब घेतल्यानंतर या बलात्काराच्या गुन्ह्यात आणखी कलमांची वाढ होऊ शकते, अशी भीती घातली. तसे न करण्यासाठी त्याने तक्रारदारांना एक लाखांची मागणी केली. पाटील याच्या वतीने अ‍ॅड. पडवळ याने देखील 27 सप्टेंबरला फोन करून या प्रकरणात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परंतु, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

यामध्ये पाटील आणि अ‍ॅड. पडवळ लाचेची मागणी करताना आढळले. तसेच, उपनिरीक्षक पाटीलला सापळ्याबाबत संशय आल्याने त्याने त्या वेळी लाच स्वीकारली नाही. या प्रकरणी आता लाचेच्या मागणीवरून अ‍ॅड. पडवळ आणि पाटीलवर गुन्हा दाखल होऊन पाटीलला याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्योती पाटील यांनी ही कारवाई केली.

म्हणून त्या वेळी स्वीकारली नाही लाच
तक्रारदाराच्या सांगण्यानुसार एसीबीने ट्रॅप लावल्यानंतर उपनिरीक्षक पाटील याच्या गाडीत जेव्हा तक्रारदार पैसे घेऊन बसल्यानंतर पाटीलला आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने आळेफाटा रोडने 500 मीटरपर्यंत जाऊन तेथून यूटर्न घेऊन तक्रारदाराला पुन्हा त्याच्या गाडीपाशी सोडले. त्या वेळी तक्रारदाराने उतरताना एसीबीच्या अधिकार्‍यांना इशारा केल्यानंतर पथकाने पाटीलला ताब्यात घेतले. त्यानंतर अ‍ॅड. पडवळ यांच्यावर ट्रॅप लावला असता 'राहु द्या पाटील घाबरत आहे,' असे म्हणत पडवळ कोर्टात निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.