Temperature rise | महाराष्ट्र धगधगता अग्निकुंड; अनेक शहरांचा पारा 45 वर  
पुणे

Temperature rise | महाराष्ट्र धगधगता अग्निकुंड; अनेक शहरांचा पारा 45 वर

पुन्हा उष्णतेची लाट

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सोमवारी पुन्हा एकदा राज्यात धगधगता अग्निकुंड पेटल्याप्रमाणे उकाडा जाणवत होता. दिवसभर अंगाची लाही लाही होऊन नागरिक उन्हात अक्षरशः भाजून निघाले. हवामान विभागाने राज्यात ‘हीट डिस्कम्फर्ट’ जाहीर केला असून, सावधानतेचा इशारा दिला आहे. किमान-कमाल तापमानात अवघ्या 10 ते 13 अंशांचे अंतर उरल्याने अहोरात्र उकाडा जाणवत आहे. त्यामुळे पंखे, कुलरही शरीराला गारवा देण्यात कमी पडत आहेत.

राज्यातील हवामानात गत 24 ते 72 तासांत मोठे बदल झाले असून, वातावरण पूर्ण शुष्क झाल्याने सूर्याची किरणे राज्यात तीव्रतेने पडत आहेत, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात अवघे 10 ते 13 अंशांचे अंतर राहिले आहे. जणू दिवस-रात्रीचे तापमान एकच झाल्यासारखी स्थिती असल्याने राज्यात 24 तास उकाडा जाणवत आहे. सोमवारी अवघा महाराष्ट्र उष्ण लहरींनी होरपळून गेला. नागरिक अक्षरशः उष्णतेत भाजून निघाले. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात ‘हीट डिस्कम्फर्ट’ म्हणजे अस्वस्थ करणारे वातावरण, असा इशारा जाहीर देत बाहेर पडताना सावध राहा. घरातदेखील थंड वातावरणात राहा, असा सल्ला दिला आहे.

सोमवारचे तापमान

अकोला 45.1, निफाड (नाशिक) 45, अमरावती 44, बुलडाणा 43.2, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 41, गोंदिया 39, नागपूर 42, वाशिम 42.6, वर्धा 43.8, यवतमाळ 41.4, पुणे 41.6, अहिल्यानगर 43.8, जळगाव 44.3, मालेगाव 42, नाशिक 42, सांगली 39, सातारा 41, मुंबई 35.4, रत्नागिरी 34, छत्रपती संभाजीनगर 43.4, बीड 43.5.

थंड महाबळेश्वरही तापले

सोमवारी अकोला येथे सर्वाधिक तापमान 45.1 अंश सेल्सिअस, तर सरासरी कमाल तापमान 43 अंशांवर होते. महाराष्ट्राचे काश्मीर म्हटले जाणारे महाबळेश्वरही तापले होते. तेथील कमाल तापमान 33 अंशांवर असले, तरी किमान तापमान 22 वर होते. त्यामुळे किमान-कमालमध्ये अवघ्या 11 अंशांचे अंतर राहिल्याने महाबळेश्वरमध्येदेखील अहोरात्र असह्य उकाडा जाणवत आहे.

कमाल-किमानचे अंतर घटले

महाबळेश्वर 33 (22), मुंबई 35.4 (27.5), रत्नागिरी 34 (27.6), अलिबाग 38 (23.5), कोल्हापूर 40 (25.7).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT