पुरंदर तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र; भूजल पातळीत घट Pudhari
पुणे

पुरंदर तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र; भूजल पातळीत घट

पाण्याअभावी फळबागा जळू लागल्या; चार्‍याचे भाव वाढल्याने पशुपालक चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर ताटकळत बसावे लागत आहे. जनावरांची अवस्था त्यापेक्षा बिकट आहे. आगामी काळात पाणी आणि चार्‍याची मोठी टंचाई भासण्याची चिन्हे आहेत. दुधाळ जनावरांना हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच चार्‍याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत.

अगोदरच दुधाला बाजारभाव मिळत नसल्याने पशुपालक अडचणीत आहेत. दुसरीकडे वाळलेल्या चार्‍याचे भाव वाढतच चालले आहेत. दुधाचा निर्मिती खर्च वाढला आहे. पशुखाद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच दुधाला दर नसल्याने व्यवसाय तोट्यात गेला आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून बाहेरगावच्या व्यापार्‍यांनी पुरंदरमध्ये येऊन मोठ्या प्रमाणावर कडबा खरेदी केला. हा कडबा बाहेरील जिल्ह्यांत नेण्यात आला. त्यामुळे स्थानिक बाजारात पशुपालकांना कडबा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी, कडब्याचे भाव वाढले आहेत. पाण्याअभावी फळबागा जळून गेल्या आहेत.

पशुखाद्याचे दर वाढले

पशुखाद्याच्या एका पिशवीची किंमत 1300 रुपये, तर चार्‍यासाठी ऊस प्रतिटन 4 हजार रुपये, वैरण (ज्वारीचा कडबा) बाजारभाव शेकडा 3500 पासून ते 5000 पर्यंत जाऊन पोहचले आहेत. त्यामुळे सध्या पशुधन सांभाळणे शेतकर्‍यांना अवघड झाले आहे.

सध्या विविध गावांत पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीने तळ गाठलेला आहे. टँकरसाठी प्रस्ताव देऊन आठ दिवस झाले तरीही प्रशासनाकडून टँकर पुरवण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावामध्ये जलजीवन योजनेचे काम अपूर्ण आहे.
- संतोष काळे, सरपंच, सोनोरी.
कडब्याच्या कमतरतेमुळे कडबा भाव खात आहे. कमी उत्पादनामुळे ज्वारीचे दर वाढणार आहेत. जनावरांचा चारा महाग झाल्याने दुष्काळाने होरपळत असलेल्या पशुपालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
- प्रकाश फडतरे, पशुपालक, बोपगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT