पिंपरी(पुणे) : उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील पाच महिन्यांत तब्बल नऊ कोटी 18 लाख 94 हजार 38 रुपयांचा ऐवज शहरातून चोरीला गेला आहे. दोन कोटी 93 लाख 94 हजार 792 रुपयांचा ऐवज पोलिसांना परत मिळवता आला आहे. म्हणजे अथक प्रयत्नानंतर केवळ 32 टक्केच ऐवज पोलिसांच्या हाती लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये एकूण 18 पोलिस ठाणी येतात.
या पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली. यामध्ये पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा स्वतंत्र आढावा घेतला. या वेळी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रमाण कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर त्यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.
गुन्ह्याची उकल होऊनही नागरिकांना भुर्दंडच
मालमत्तेसंबंधी एखादा गुन्हा घडल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी नागरिक पोलिसात धाव घेतात. पोलिस सदर गुन्ह्याची उकलही करतात. मात्र, त्या आरोपीने चोरून किंवा फसवून नेलेला मुद्देमाल हस्तगत होत नाही. त्यामुळे गुन्हा उघड होऊनही तक्रारदाराला त्याचा थेट फायदा होत नाही. तसेच, पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला जाणारा आणि हस्तगत करण्यात आलेला ऐवज यामध्ये मोठी तफावत आहे. यावर विशेष काम करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले
दोषसिद्धीही वाढवण्याची गरज
गुन्हेगारांच्या दोषसिद्धीचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. याबाबत पोलिस आयुक्तांनी खंत व्यक्त केली आहे. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर तक्रारदार फितूर झाल्याने गुन्हेगार सुटल्याची ओरड केली जाते. मात्र, अनेकदा तपास अधिकारीदेखील काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडत नाही. पंचनामे, पुरावे, साक्षीदाराचे जबाब, तपास टिपण, मुद्देसूद केलेला तपास या गोष्टीदेखील यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तपासी अधिकार्यांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिस निरीक्षकांनी करावा तपास
गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त बिष्णोई यांनी दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, मोटार चोरी यासारख्या गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षकांनी करण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा एकदा या आदेशाप्रमाणे काम होणे गरजेचे आहे.
दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
शहरातून दरमहा शेकडो वाहने चोरीला जातात. मात्र, पोलिस ठाण्यातील तपास पथक दोन-पाच दुचाकी हस्तगत करून स्वतःची पाठ थोपटून घेतात. चालू वर्षात 583 वाहने चोरीला गेली आहेत. या वाढत्या दुचाकी चोरीला अंकुश लावण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली. मात्र, तरीदेखील त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचे चित्र आहे.
एकूण चोरीला गेलेल्या मालाच्या तुलनेत हस्तगत ऐवज
ठाणेनिहाय टक्केवारी (1 जानेवारी ते 31 मे 2023)
चोरीला गेलेला ऐवज मिळवण्यासाठी प्रभारी अधिकार्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी आगामी काळात स्पेशल ड्राईव्हदेखील घेण्यात येणार आहे.
-विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.