पुणे : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदभरतीच्या शैक्षणिक अर्हतेबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा पीएच.डी. ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शासनाने स्पष्टीकरणात्मक पत्र जारी करून राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने १८ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी १ जुलै २०२१ पासून पीएच.डी. पदवी अनिवार्य करण्याची तरतूद केली होती. त्यानंतर ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे ही अधिसूचना राज्यात लागू करण्यात आली होती. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने ३० जून २०२३ रोजी अधिसूचनेत सुधारणा करून सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट/सेट/स्टेल ही किमान पात्रता असल्याचे नमूद केले.
या सुधारणेला राज्य शासनाने ५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली. मात्र, या निर्णयात मूळ शासन निर्णयातील कोणत्या परिच्छेदात सुधारणा केली, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आता शासनाने स्पष्ट केले की, दि. ५ मार्च २०२४ रोजी करण्यात आलेली सुधारणा ही दि. ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ४.१० संदर्भात आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेतील संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून, इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.