बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील भिगवण मार्गावर तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्यांचा वापर वाहने पार्किंगसाठी केला जात असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. यावरूनच बारामतीत पार्किंगची काय अवस्था आहे? हे अधोरेखित झाले आहे. पंचायत समिती ते सहयोग सोसायटी या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने लावली जातात. मुख्य रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी व्हावी, यासाठी सेवा रस्ते तयार करण्यात आले. मात्र, वाहने पार्किंगला कुठेही जागा नसल्याने वाहनचालक सोयीच्या ठिकाणी वाहने पार्क करतात.
बारामती शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग असलेला भिगवण रस्ता आहे. महाविद्यालये, पंचायत समिती, न्यायालय, खासगी रुग्णालये, बँका तसेच औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी, पेन्सिल चौक या ठिकाणी जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण मोठा आहे. रेल्वेचा धक्काही याच मार्गावर असल्याने या ठिकाणी जड वाहने ये-जा करतात. शहराच्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पट वाहनांची संख्या वाढल्याने वाहने पार्किंगला बारामतीत अडचण येत आहे. भिगवण रस्त्यावर रस्तादुरुस्तीसह सुशोभीकरण सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. सेवा रस्त्यांचा वापर फक्त पार्किंगसाठीच होत असून, वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पार्किंगसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. सुशोभीकरण सुरू असताना कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावले गेलेले नाहीत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरील वाहने पार्किंग बाजूला करून रस्ते वाहतुकीसह सुरळीत करावीत, अशी मागणी बारामतीकर करीत आहेत.