पुणे

'सर्व्हंट्स ऑफ इंडिया'च्या बैठकीत मिलींद देशमुखांचा गोंधळ, अध्यक्ष साहू पडले आजारी

Servants of India Society : देशमुख यांचा तोल गेला, संचालकांच्या अंगावर गेले धावून

पुढारी वृत्तसेवा

पुणे : देशाच्या कानाकोप-यातून सर्व्हंट्स ऑफ इंडियाचे संचालक तीन दिवसांपासून पुणे मुक्कामी आहेत. दरवर्षी प्रमाणे 6 जून रोजी ही बैठक सुरू झाली, मात्र पहिल्याच दिवशी ती वादळी ठरली. कारण सचिव पदावरुन हकालपट्टी केलेले मिलींद देशमुख या बैठकीत आले आणि त्यांनी जुन्या थाटात फायनान्स कमिटीतील सदस्यांशी वाद घातला. अंगावर धावून गेले. त्यामुळे ही बैठक अर्धवट सोडून संचालक निघून गेले.

सर्व्हंट्स ऑफ इंडिया संस्थेतील वाद अजूनही निवळलेले नाहीत. कारण दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक यावर्षी 6 ते 14 जून या कालावधीत होते. यात प्रामुख्याने 31 ऑगस्ट पर्यंत संस्थेचा आर्थिंक,प्रशासकीय लेखाजोखा, धर्मदाय आयुक्त आणि प्राप्तिकर विभागाला सादर करावा लागतो. त्यासाठीची ही बैठक यंदाही आयोजित केली होती. मिलींद देशमुख यांच्यावर असलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन त्यांना 5 एप्रील रोजी गुन्हा दाखल झाला. यात त्यांच्यावर गोखले संस्थेतील 1 कोटी 42 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवत गोखले संस्थेच्या उपकुलसचिवांनी डेक्कन पोलीसात तक्रार दिल्याने 5 एप्रील रोजी देशमुख यांना पोलीसांनी अटक केली.

आठ दिवस येरवडा तुरुंगात मुक्काम करुन आलेल्या देशमुख यांना जामीन मिळाला. या सर्व प्रकाराने अध्यक्ष दामोदर साहू, उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांच्यासह इतरही संचालकांना एप्रिलमध्ये पुणे मुक्कामी यावे लागले. अखेर अध्यक्षांनी मिलींद देशमुख यांना सचिव पदावरुन हटवून स्वतःकडे अधिकार ठेऊन घेतले.

आणि मिलींद देशमुखांचा तोल गेला...

एप्रिल महिन्यात आलेले संचालक मंडळाच्या बैठकीत जूनमध्ये भेटू असे आश्वासन देत सर्व संचालक आपापल्या गावी निघून गेले. तेव्हापासून संस्थेतील वातवरण अस्थिर असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी, 6 जून रोजी सर्व संचालक पुणे मुक्कामी आले. मात्र 7 जून रोजीच्या बैठकीत मिलींद देशमुख सचिव असल्याच्या भ्रमातच संस्थेत आले. त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा एक अहवाल सादर केला जात होता. ते पाहून देशमुख यांचा तोल गेला आणि त्यांनी बैठकीतच गोंधळ घातला. तसेच त्यांनी गोखले इन्स्टिट्युटचे प्रभारी कुलगुरु प्रा. शंखर दास यांच्या काही निर्णयांबद्दल आक्षेप घेतले. यावेळी देशमुख यांचा मुलगा चिन्मय हा देखील घटनाबाह्य पद्धतीने संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित असल्याचा आरोप होत आहे.

संस्थेची प्रतिष्ठा राखण्यासाठी पोलीसांत तक्रार नाही

देशमुख यांनी संचालक रमाकांत लेंका यांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हे भांडण इतके विकोपाला गेले की आता बैठकीत मारामारी होते की काय असे वाटत होते. त्यामुळे व्यथित होऊन उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा हे बैठक सोडून बाहेर पडले. देशमुखांना जामीन मिळाला असून त्यांनी त्याचे पालन करीत नसल्याचे दिसत असल्याने पोलीसांत तक्रार करावी काय यावरही चर्चा झाली. मात्र, संस्थेची प्रतिष्ठा राखली जावी म्हणून तसे न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अध्यक्ष साहू खरेच आजारी आहेत काय?

या बैठकीसाठी देशाच्या विविध भागातून संचालक आले आहेत. यात अध्यक्ष दामोदर साहू ओडिशा, उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा उत्तर प्रदेश, रेमाकांत लेंका, गंगाधर साहू, दिनेश मिश्रा, अमरिश तिवारी, पी.के.द्विवेदी हे सर्वजण 6 जून रोजीच आले. अध्यक्ष दामोदर साहू हे खरेच आजारी आहेत की त्यांना देशमुखांनी आजारी पडण्यास भाग पाडले? यावर संस्थेत चर्चा सुरू आहे. त्यांनी या बैठकीस येणार नसल्याची सूचना दिली. त्यामुळे उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 जून रोजी यंदाच्या सत्राची बैठक सुरू व्हायला पाहिजे होती, मात्र तसे पत्र अध्यक्षांनी दिले नसल्याने सत्र झालेले नाही.

देशमुख यांचा आंदोलनाचा डाव?

तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत फायनान्स कमिटीचे सदस्य उपस्थित होते. अचानक देशमुखांनी गोखले इन्स्टिट्युटच्या प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्ना केला. तसेच आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण उघडीस येऊ नये म्हणून संचालक मंडळावर दबाव आणण्याच्या केला आणि रमाकांत लेंका यांच्या अंगावर धावून गेले. नंतर देशमुख प्रभारी कुलगुरु प्रा. शंकर दास यांच्याबाबत विरोधात शहरातील काही राजकीय लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र रविवारी सुट्टी असल्याने डॉ. दास उपस्थित नसल्याने हा डाव फसला. माजी आमदार संजय जगताप यावेळी देशमुख यांच्या सोबत कॉन्सिल हॉलमध्ये गुफ्तगू करीत असल्याचे दिसून आले.

झाला प्रकार खूप गंभीर आहे. मी वाराणसी येथून 48 तासांचा प्रवास करुन पुण्यात आलो. अध्यक्ष साहू आजारी असल्याने माझ्या उपस्थितीत बैठक सुरु झाली. मात्र त्यात मिलींद देशमुख खूप आक्रमक झाले. काही संचालकांशी त्यांचा वाद झाला. हा इतका विकोपाला गेला की, मला वाटले आता मारामारी होते की काय. त्यामुळे मी त्या बैठकीतून दुःखी होऊन उठून आलो. देशमुख यांनी सायंकाळी येऊन माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण मी झाल्या प्रकाराने व्यथित झालो आहे. आता पुढची बैठक कधी घ्यायची यावर अध्यक्ष यांच्याकडून निरोपाची वाट पाहत आहे.
-आत्मानंद मिश्रा,उपाध्यक्ष सरव्हंट ऑफ इंडिया सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT