मागासवर्गीयांसाठीचा 15 टक्के निधी खर्चच नाही; पाहुणेवाडी ग्रामपंचायत सदस्याचा आरोप File Photo
पुणे

मागासवर्गीयांसाठीचा 15 टक्के निधी खर्चच नाही; पाहुणेवाडी ग्रामपंचायत सदस्याचा आरोप

याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

माळेगाव: ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये पंधरा टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असताना पाहुणेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी मागासवर्गीयांचा पंधरा टक्के निधी गेले चार वर्षे खर्चच केला नाही.

त्यामुळे दलितवस्तीला विकासापासून दूर राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे सदस्य दादा सखाराम जगताप यांनी केला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

पाहुणेवाडी ग्रामपंचायतीने सन 2022 ते 2023 या वर्षात 6 लाख 28 हजार 532 एवढा निधी वसुल केला. सन 2023 ते 2024 या कालावधीत 9 लाख 13 हजार 675 रुपये ग्रामनिधी वसूल झाला. तर चालू वर्षी 8 लाख 63 हजार 295 रुपये नोव्हेंबरअखेर पर्यंत वसूल झाला.

सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी पंधरा टक्के निधी खर्चाबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार मागणी करून तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत आग्रह धरूनदेखील या निधीबाबत निर्णय घेतला नाही, असे जगताप यांनी सांगितले.

निधी खर्च केला जात नसल्याने दलित वस्तीमधील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा व वैयक्तिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले. गटविकास अधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे

उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

दलितवस्तीचा पंधरा टक्के निधी खर्च करण्यासंबंधी पदाधिकारी व प्रशासन टाळाटाळ करत आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ग्रा.पं सदस्य सचिन मारुतराव तावरे, डॉ. सचिन विश्वनाथ बुरूगंले, आशा लाला यादव, उज्वला केशव तावरे, पौर्णिमा सचिन खुडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT