पुणे

औंध रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र खिडकी नावापुरती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना बरेचदा तपासणीसाठी, औषधोपचारांसाठी जावे लागते. प्रमाणपत्रांप्रमाणेच केस पेपर काढता यावेत, यासाठी दिव्यांगांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात आली आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी खिडकी कायम बंदच असल्याचे निदर्शनास आले आहे. औंध जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना बुधवारी आणि गुरुवारी प्रमाणपत्र वितरणासाठी बोलावले जाते. त्यासाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, इतर दिवशी तपासणी, औषधोपचार यांसाठी दिव्यांगांना रुग्णालयात यावे लागते. सकाळी 9.30 पासूनच केस पेपरच्या खिडकीसमोर गर्दी असते.

दिव्यांगांना केस पेपर काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहावे लागते. फार वेळ उभे राहता येत नसल्याने इतरांना विनंती करावी लागते, बरेचदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. खिडकीची व्यवस्था केवळ नावापुरतीच असल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिव्यांग व्यक्तींनी 'पुढारी' ला सांगितले.

जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना केस पेपरसाठी व औषध घेण्यासाठी स्वतंत्र खिडकी आहे. केवळ दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणाच्या दिवशी केस पेपर सहज मिळाले. परंतु, इतर आजारांवर उपचारासाठी आल्यावर मात्र केस पेपर व औषधासाठी स्वतंत्र खिडकी बंदच असते. त्यामुळे माझे केस पेपर रांगेतील रुग्णाबरोबर भांडण झाले.

                                               -एक पीडित दिव्यांग रुग्ण.

दिव्यांगांच्या शारीरिक मर्यादांचा विचार करता केस पेपर व औषध वितरण खिडकीसह ओपीडीमध्ये प्राधान्यक्रमाने उपचार दिले पाहिजेत. ओपीडीच्या प्रतीक्षा रांगेत बसण्यासाठी व्यवस्था नाही. वेळेवर व्हिलचेअरसुद्धा उपलब्ध होत नाही. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने दिव्यांग येतात. कोणत्याही दिव्यांगांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

             – हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे

दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करण्यात आली आहे. केसपेपरसाठीही स्वतंत्र खिडकी असून, ती कायम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            – डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध रुग्णालय.

SCROLL FOR NEXT