पुणे: माझा जन्म झाल्यावर पाच-सहा महिन्यांतच वडिलांचे निधन झाले. आईला दुःखाला सामोर जावे लागले. पण, ती खचली नाही. पदर खोचून ती नियतीविरुद्ध उभी राहिली. आम्हा मुलांची आई व वडील, अशा दोघांची भूमिका उत्कृष्टपणे निभावत सर्व भावंडांना आयुष्यात उभे केले. हे सर्व करताना कितीही संकटे आली, तरी तुम्ही नेकीने जगले पाहिजे, असा तिचा आग्रह असायचा. आज जर आम्ही भावंडे काही करू शकलो असू, तर त्यामागे नेकीने जगा ही आईची शिकवण कारणीभूत आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
डॉ. आढाव यांच्या आई बबू आढाव यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. आढाव यांनी आईविषयीच्या भावनांना मोकळी वाट करून दिली. या वेळी कष्टाची भाकर येथे काम करणार्या रंजना धोंडिबा दहिभाते आणि भरत लक्ष्मण पारगे यांना गौरविण्यात आले. माजी पोलिस अधिकारी मधुकर झेंडे, रजनी धनकवडे, शीला बाबा आढाव, श्यामकांत मोरे, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, शारदा वाडेकर, संतोष नागरे आदी उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, आईने कष्टाची भाकरसारख्या उपक्रमाकडे दीर्घकाळ लक्ष दिल्यामुळे उपक्रमाला एक प्रकारची शिस्त लागली. अलीकडेच कष्टाच्या भाकरने पन्नास वर्षे एवढा दीर्घकाळाचा टप्पा पूर्ण केला आहे. हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दत्तात्रय डोंबाळे यांनी आभार मानले.