पुणे

जेजुरी रेल्वेस्थानकातील कामांची वरिष्ठ अधिकारी करणार पाहणी; खा. सुळे यांनी मांडल्या समस्या

अमृता चौगुले

जेजुरी(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी रेल्वेस्थानक परिसरातील विकासकामांच्या दर्जाबाबत सोमवारी (दि. 30) पुणे विभागीय कार्यालयात खा. सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी कामांची पाहणी करण्याबाबत ठरले. त्यानंतर जेजुरीतील आंदोलकांनी बुधवारी (दि. 1) उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

बैठकीत निरा, जेजुरी व दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील रेल्वेफाटक, बारामती-फलटण लोहमार्गावरील समस्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. मंडल रेल प्रबंधक इंदू दुबे, विभागीय अभियंता विकास कुमार, उपविभागीय अभियंता मनीष कुमार, अप्पर रेल्वे प्रबंधक बि—जेशकुमार सिंह, सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार, वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, सेंट्रल रेल्वे बोर्डाचे विभागीय सदस्य प्रवीण शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील आदी उपस्थित होते.

जेजुरी रेल्वेस्थानकासमोर सांडपाणी वाहून जाण्यासाठी सुरू असलेल्या गटार योजनेचे काम बंद पाइपलाइन भुयारी पद्धतीने व्हावे, रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारावा, लांब पल्ल्याच्या गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, गाडी क्र. 12779/12780 व यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस क्र. 17317/17318 आदी गाड्यांना जेजुरी येथे थांबा द्यावा आदी मागण्या यांवेळी करण्यात आल्या. रेल्वे विभागीय अभियंता, उपविभागीय अभियंता आदी अधिकारी बुधवारी (दि. 1) प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असल्याचे ठरले. त्यामुळे जेजुरी रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांचे बुधवारी (दि. 1) आमरण उपोषण स्थगित केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT