मंचर: साल (ता. आंबेगाव) येथे कामावर जात असलेले पती-पत्नी पाय घसरून साल इंगवलेवाडी येथील पाझर तलावात पडले. या घटनेत देवराम सखाराम पारधी (वय 60) हे पाझर तलावात बुडाले असून, त्यांचा शोध सुरू आहे, तर त्यांच्या पत्नी धोंडाबाई देवराम पारधी बचावल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साल ठाकरवाडी येथील देवराम पारधी व त्यांच्या पत्नी धोंडाबाई पारधी या शेतमजुरी करतात. दररोज नेहमीप्रमाणे ते इंगवलेवाडी येथील पाझर तलाव क्रमांक 1 वरून साल येथे जात होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते तलावात पडले. त्या वेळी धोंडाबाई पारधी या दगडाचा आधार घेऊन तलावात थांबल्या, तर देवराम हे तलावात बुडाले. (Latest Pune News)
काही वेळानंतर स्थानिक अशोक किशन गावडे यांनी धोंडाबाई यांना पाण्यातून बाहेर काढले व त्यांना पुढील उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पाण्यात बुडालेले देवराम यांचा शोध न लागल्याने सकाळपासून त्यांचा शोध सुरू आहे.
तहसीलदार संजय नागटिळक, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. निसर्ग साहस संस्थेचे धनंजय कोकणे व त्यांचे सहकारी तसेच सर्व तलाठी, कोतवाल, स्थानिक ग्रामस्थ हे देवराम पारधी यांचा शोध घेत आहे.
रेस्क्यू टीमचे धनंजय कोकणे आणि त्यांच्या सहकार्यांनी बोटीद्वारे तलावातील पाण्यात बेपत्ता झालेले देवराम पारधी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधार पडू लागल्यामुळे शोध कार्य थांबवले असून गुरुवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू होईल.- संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव