पुणे: महापालिकेसाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने मतदानासाठी हजेरी लावली. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ मतदारांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काठी, वॉकरच्या आधाराने तसेच कुटुंबीयांच्या मदतीने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचलेल्या ज्येष्ठांना सुविधांअभावी त्रास सहन करावा लागला.
काही मतदान केंद्रांवर व्हीलचेअर वगळता अन्य कोणतीही मदत व्यवस्था नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अनेक ठिकाणी मतदान केंद्र वरच्या मजल्यावर असल्याने आजारी व अशक्त ज्येष्ठांना चढ-उतार करणे अशक्य झाले. लाकडी व अपुरे रॅम्प, स्वयंसेवकांची अपुरी संख्या आणि विश्रांतीसाठी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ मतदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
92 वर्षीय नौशाबा खातून यांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य
प्रभाग क्रमांक 18 वानवडी-साळुंखे विहार या प्रभागातील परमार सोसायटीतील मतदान केंद्रावर 92 वर्षीय नौशाबा खातून यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. नौशाबा यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील शमशुल इस्लाम आणि निदा सिद्दिकी हेही मतदान करण्यासाठी आले होते. व्हीलचेअरवर बसून नौशाबा खातून यांनी मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक निवडणुकीत मी मतदानाचा हक्क बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर मतदान करण्याचा आनंद दिसून येत होता. उतारवयातही त्यांच्यातील ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. देशाप्रति जबाबदारी म्हणून मी मतदान केले, मी प्रत्येक निवडणुकीत मतदान करते. मतदान केल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मतदान केंद्रावर व्हीलचेअर सोडली तर इतर कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. घरी मतदान असते तर चांगले झाले असते. आजारी असल्याने चालत येत नाही. त्यात मतदान केंद्र दुसऱ्या मजल्यावर असून रॅम्प लाकडी आहे. त्यामुळे मतदान केंद्रात जाता येणार नाही. काय करावे समजत नाही. 1 तास मतदान केंद्रावर थांबून राहिले.सुधा पाध्ये (वय 91) रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर
आतापर्यंत किती निवडणुकांसाठी मतदान केले, याची आता मोजदादही नाही. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात खूप फरक पडला आहे. मतदारांनी आपल्या भागात सुधारणा करणाऱ्या उमेदवाराला मत दिले तर विकास शक्य होऊ शकतो.कल्पना अंतरापूरकर, (वय 80), धायरी