पुणे

पिंपरी : वाहन खरेदीसाठी करावी लागतेय प्रतीक्षा ! सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन उद्योगातील पुरवठा साखळी विस्कळीत

अमृता चौगुले

दीपेश सुराणा : 

पिंपरी : दुचाकी इलेक्ट्रिक तसेच चारचाकी वाहनांसाठी सेमीकंडक्टर चीप हा महत्त्वाचा भाग आहे. सध्या या सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा वाहनक्षेत्राला जाणवत आहे; मात्र त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे वाहन उद्योगातील पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. वाहनांसाठी बुकिंग केल्यानंतरचा प्रतीक्षा कालावधी वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍या ग्राहकांना त्यासाठी तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पामुळे सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात सेमीकंडक्टर चीपची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे मात्र गेल्या काही वर्षांत सेमीकंडक्टरच्या चीपची जागतिक बाजारपेठेत जास्त कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे. पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला सेमीकंडक्टरची टंचाई जाणवत आहे.

सेमीकंडक्टर चीप काय आहे ?
लॅपटॉप, स्मार्टफोन, मशीनशिवाय सर्व काम अपूर्ण आहे. ही गॅजेट्स आणि मशीन्स प्रत्येकाकडे सापडतील. मग तो कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो, स्मार्ट कार असो, वॉशिंग मशीन असो, एटीएम असो, हॉस्पिटल मशीन असो किंवा हातातला स्मार्टफोन असो. या सगळ्यांना सेमीकंडक्टरची खूप गरज आहे.

प्रवासी वाहनांची विक्री 2.8 लाख युनिट
सेमीकंडक्टरचा सुधारत असलेला पुरवठा आणि सणासुदीच्या काळातील मागणी लक्षात घेता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, प्रवासी वाहन विभागातील विक्री 2.8 लाख युनिट्सवर होती. दुचाकी वाहनांनी 15.6 लाख युनिट्सची विक्री केली. तर तीनचाकी वाहनांची केवळ 38,000 युनिट्सची विक्री झाली. यंदा मान्सूनने दिलेली चांगली साथ आणि आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता वाहनांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे मत सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी व्यक्त केले आहे.

वाहनांचा वेटिंग पीरियड वाढला
सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा अद्यापही जाणवत आहे. हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत आहे. मात्र, त्यामध्ये पूर्ण सुधारणा झाली नसल्याने पुरवठा साखळी विस्कळीत आहे.

पर्यायाने वाहन उद्योगांचा उपाययोजनेवर भर
टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाहन उद्योगामध्ये सेमीकंडक्टर तुटवड्याची परिस्थिती अल्पकालावधीसाठी अनिश्चित आहे. हळूहळू तुटवड्याची ही परिस्थिती सुधारत आहे. बदलत्या परिस्थितीनुसार कंपनी आवश्यक लवचिकता ठेवून काम करत आहे. वाहन उद्योगातील जोखीम कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी कंपनी प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

सेमीकंडक्टर चीप लागणार्‍या महागड्या कारसाठी बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना प्रत्यक्ष ताब्यात मिळण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागत आहे. तर, कमी किमतीच्या कार मिळण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. दुचाकीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढलेली मागणी आणि सेमीकंडक्टर चीपचा जाणवणारा तुटवडा यामुळे त्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे, अशी माहिती वाहन क्षेत्रातील उद्योजक बिपीन ठाकूर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT