पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'पैसे देणारे अनेक आहेत; परंतु खरी गरज सेवेची आहे. सेवा दिली गेली पाहिजे. नि:स्वार्थपणे काम करणार्यांबद्दल नागरिकांमध्ये नेहमीच आस्था असते. सेवा हा भारतीय परंपरेचा पाया आहे,' असे प्रतिपादन उद्योजक अभय फिरोदिया यांनी केले.
सृजन फाऊंडेशन आणि कोहिनूर ग्रूपकडून जनसेवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शहा यांना फिरोदिया यांच्या हस्ते 'सृजन पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. उद्योजक कृष्णकुमार गोयल, फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, "लोकांच्या दुःखावर उपाय शोधणे हे खूप महत्त्वाचे आहे. काम करत असताना मी खूप मोठा आहे, हे न म्हणणे हा गुण आहे. असा गुण असलेली माणसं जास्त नाहीत. भारताची लोकसंख्या मी चौपट होताना बघितली आहे. आधुनिक जगात एकत्र कुटुंबव्यवस्था नामशेष झाली आहे.
पुण्यात अनेक कुटुंबात केवळ पती-पत्नी आणि मुले एवढेच राहतात. आई-वडिलांच्या नोकरीमुळे मुलांचे संगोपन व्यवस्थित होत नाही, तसेच वृद्धांनादेखील आधार मिळत नाही. पुढील काळात असा आधार शोधणार्या वृद्धांची संख्या वाढेल. वृद्धांची सपोर्ट सिस्टिम नाहीशी होत आहे. वृद्धांसाठी आधार असणे गरजेचे आहे."